नोकरीच्या बहाण्याने युवतीची विक्री;
पाच जणांना सश्रम कारावास
---
चार आरोपी गुजरातचे, दोन महिलांचा समावेश
सकाळ वृत्तसेवा
नंदुरबार, ता. ३ : कंपनीत नोकरीस लावून देण्याच्या बहाण्याने १९ वर्षीय युवतीची विक्री करणाऱ्या पाच आरोपींना न्यायालयाने सात वर्षे सश्रम कारावास व प्रत्येकी पाच हजार रुपयांचा दंड ठोठावला. नंदुरबार जिल्हा सत्र न्यायालयाचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए. एच. सय्यद यांनी हा निकाला दिला. यातील चार आरोपी गुजरातमधील असून, त्यात दोन महिलांचा समावेश आहे.
चिंचपाडा (ता. नवापूर, जि. नंदुरबार) येथील १९ वर्षीय युवतीची नंदुरबारात एका नर्सिंग स्कूलमध्ये शिकत असताना, रोहित वळवी याच्याशी ओळख झाली होती. एका कंपनीत नोकरीस लावून देण्याच्या बहाण्याने रोहित तिला व्यारा (गुजरात) येथे घेऊन गेला. तेथे रोहितने पीडितेला नेहा नामक महिलेकडे सोडले. पीडितेला पाटी येथील भारती नामक महिलेच्या घरी सोडण्यात आले. ११ जून २०२५ ला भारती पीडितेस आहवा येथे घेऊन गेली. तेथे पीडितेस दोन व्यक्तींना दाखविले. याबाबत पीडितेने विचारले असता, ‘मी तुला विकत घेतले असून, जास्त बोलशील तर मारून टाकेल’, अशी धमकी भारतीने दिली. पीडितेचे बनावट आधारकार्ड बनवून किरीटभाईमार्फत पार्थ नामक मुलास दाखविण्यात आले. ‘तुझा पार्थसोबत विवाह होणार असून, ते तुला त्यांच्या गावी घेऊन जातील. गेली नाहीस तर तुला मारून टाकू’, अशी धमकी देत पीडितेचा पार्थसोबत विवाह झाल्याची गुजराथी भाषेत नोटरी करून घेतली.
पार्थने पीडितेस त्याच्या घरी गुजरातमधील नडियाद येथे नेले. विवाहकामी किरीटभाईने स्थळ दाखविल्याचे पार्थच्या कुटुंबियांकडून पीडितेला समजले. विवाह लावून देण्याच्या बदल्यात किरीटने पार्थच्या कुटुंबियांकडून ४ लाख घेतले होते. रोहित वळवी, नेहा ऊर्फ स्नेहा वळवी, भारती उर्फ हंसाबेन गामीत, पार्थ भाटिया यांनी मिळून पीडितेला विकून दिले होते.
विसरवाडीचे पोलिस उपनिरीक्षक किरण पाटील यांनी पार्थ अजयकुमार भाटिया (वय २५, रा. अमेरीकन कॉलनी, मोटा महादेव रोड, नडियाद जि. खेडा गुजरात), रोहित महेंद्र वळवी (२२, कोठली, ता. जि. नंदुरबार), नेहा वळवी (२२, साईनाथ कॉलनी, सुरत, गुजरात), भारती गामीत (पाटी, ता. डोलवन जि. तापी, गुजरात), किरीटभाई सुलेमानभाई वणकर (५२, इंदिरानगर अलिंद्रा ता. नडियाद) यांना अटक केली व अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. खटल्याची सुनावणी अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए. एच. सय्यद यांच्यासमक्ष झाली. सबळ पुराव्याच्या आधारे आरोपी पार्थ भाटिया, रोहित वळवी, नेहा वळवी, भारती गामीत, किरीटभाई वणकर यांच्यावर गुन्हा सिद्ध झाल्याने पाचही आरोपींना न्यायाधीश सय्यद यांनी दोषी ठरवून प्रत्येकी सात वर्षे सश्रम कारावास व प्रत्येकी पाच हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली, तसेच पीडितेस एक लाख अदा करण्याचे आदेश दिले.
सरकारी पक्षातर्फे ॲड. विजय चव्हाण यांनी काम पाहिले. मुख्य पैरवी अधिकारी म्हणून उपनिरीक्षक योगिता राठोड, पैरवी अंमलदार राजेंद्र गावित, देवेंद्र पाडवी, दुर्गा वळवी व भावना पाटील यांनी काम पाहिले.