पान चार
------------------------
(या बातमीशी संंबंधित लोगो, जाहिरातांचे लोगो वापरावेत)
६०८४४, ६०८४२
नाशिक : सकाळ कबड्डी प्रीमियर लीग स्पर्धेत अश्वमेध करिअर ॲकॅडमी विरुद्ध सपकाळ नॉलेज हबमध्ये सुरू असलेल्या सामन्यातील एक क्षण. दुसऱ्या सामन्यात मविप्र कर्मवीर विरुद्ध त्रिमूर्ती बॉईज संघात होत असलेल्या सामन्यातील चुरशीचे क्षण.
अश्वमेघ रायडर्स, त्रिमूर्ती बॉईज संघांची विजयी घौडदौड
‘सकाळ’ कबड्डी प्रीमियर लीग स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी रंगतदार सामने
....
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. ३ : ‘सकाळ माध्यम समूहातर्फे आयोजित ‘सकाळ कबड्डी प्रीमियर लीग स्पर्धेचा दुसऱ्या दिवशी गुरुवारी (ता.३) अश्वमेघ रायडर्स आणि त्रिमूर्ती बॉईज या संघांनीच गाजवला. प्रतिस्पर्धी संघांवर एकतर्फी विजय मात करीत विजेतेपदाची दावेदारी अधिक मजबूत केली.
पंचवटीतील स्व. मीनाताई ठाकरे विभागीय क्रीडा संकुल येथे ‘सकाळ कबड्डी प्रीमियर लीग स्पर्धेचे सामने सुरू आहेत. या स्पर्धेसाठी फ्रवशी ग्रुप ऑफ स्कुल्स, सिंग वॉरियर्स, जेम्स इंग्लिश मीडियम स्कुल, निशम डेव्हल्पर्स, बागड प्रॉपर्टीज, एसएमबीटी हॉस्पिटल, मराठा विद्या प्रसारक समाज संस्था आणि हिरे ॲकॅडमी यांच्या मोलाच्या सहकार्य या स्पर्धेसाठी लाभले आहे. या स्पर्धेप्रसंगी जिल्हा क्रीडा कार्यालयाचे क्रीडा मार्गदर्शक व हॉकी प्रशिक्षक अरविंद खांडेकर यांनी उपस्थित राहत खेळाडूंना प्रोत्साहित केले. सामने पाहण्यासाठी कबड्डी प्रेमी क्रीडा रसिकांनी गर्दी केली होती.
.....
‘अश्वमेध रायडर्स’चा एकतर्फी विजय
स्पर्धेतील रोमहर्षक कबड्डी सामन्यात अश्वमेध रायडर्स संघाने सपकाळ वॉरिअर्स संघाचा ४४ गुणांनी पराभव करत विजय संपादन केला. नाणेफेक जिंकून मैदानात उतरलेल्या सपकाळ संघाला मात्र दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. अश्वमेध रायडर्सने सुरुवातीपासूनच आक्रमक चढाई आणि भक्कम पकडीच्या जोरावर आघाडी कायम ठेवली. दुसऱ्या सत्रात अश्वमेघ संघाने आक्रमक पावित्रा कायम ठेवला. सपकाळ संघाने पुनरागमनाचा प्रयत्न केला पण अश्वमेघची आघाडीला त्यांना रोखता आले नाही. अश्वमेध रायडर्सने आपली पकड कायम राखत दुसऱ्या सत्रातही २७ गुण मिळवून निर्णायक विजयाकडे आगेकूच केले. अखेर अश्वमेध रायडर्सने सपकाळ वॉरिअर्स विरुद्धचा सामना ५७:१३ असा मोठ्या फरकाने विजय मिळविला.
उत्कृष्ट चढाई : अयान शेख (अश्वमेध रायडर्स)
उत्कृष्ट पकड : यश निरभवणे (सपकाळ वॉरिअर्स
.......
‘त्रिमूर्ती बॉईज’ची ‘कर्मवीर’वर मात
स्पर्धेतील रोमहर्षक कबड्डी सामन्यात त्रिमूर्ती बॉईज संघाने एमव्हीपी कर्मवीर संघावर सुरुवातीपासून पकड ठेवली आणि ३८ गुणांनी पराभव करत शानदार विजय संपादन केला. नाणेफेक जिंकून मैदानात उतरलेल्या त्रिमूर्ती संघाने आक्रमक चढाई केली आणि कडेकोट बचावाचा पवित्रा घेत प्रतिस्पर्धी कर्मवीर संघाला दाद मिळू दिली नाही. सामन्याच्या मध्यांतरापर्यंत त्रिमूर्ती संघाने ३५ गुणांनी मोठी आघाडी घेतली. त्यावेळी कर्मवीर संघाचे अवघे १० गुण होते. ही आघाडी त्रिमूर्तीसाठी विजयासाठी निर्णायक ठरली. दुसऱ्या सत्रात त्रिमूर्ती संघाने आक्रमक पावित्रा कायम ठेवला. कर्मवीर संघाला पुनरागमनाचा प्रयत्न करता आलाच नाही. यामुळे दुसऱ्या सत्रात ही त्रिमूर्ती संघाने २३ गुण घेत विजयाकडे वाटचाल केली. यात त्रिमूर्तीच्या खेळाडूंनी आक्रमक चढाया करीत कर्मवीर संघाला पराभवाच्या दारात उभे केले. अखेर त्रिमूर्तीने कर्मवीर संघाचा ५८:२० अशा फरकाने पराभूत करीत विजय नोंदविला.
उत्कृष्ट चढाई : वैभव देवकर (एमव्हीपी कर्मवीर)
उत्कृष्ट पकड : स्वप्निल जाधव (त्रिमूर्ती बॉईज)
….......
‘अश्वमेघ’ने ‘उदोजी मराठा’ संघाला नमवले
अश्वमेघ रायडर्स संघाने दुसऱ्या दिवसाच्या आपल्या दुसऱ्या सामन्यात एमव्हीपी उदोजी मराठा या संघावर सहज मात केली. अश्वमेध संघाने नाणेफेक जिंकून सुरुवातीपासून उदोजी मराठा संघावर वर्चस्व राखले. कमकुवत उदोजी मराठा संघाला दोन्ही सत्रात दुहेरी अंकही गाठता न आल्याने मोठी नामुष्की ओढावली. अश्वमेध संघाने पहिल्या सत्रामध्ये काहीशी सावध भूमिका घेत फक्त १३ गुण घेतले तर उदोजी मराठा संघाला केवळ पाच गुण मिळवता आले. दुसऱ्या सत्रामध्ये अश्वमेघ संघाने आक्रमक चढाई करीत उदोजी मराठा संघाला नामोहरम केले. अश्वमेघ संघाने उत्कृष्ट चढाईच्या बळावर तब्बल २७ गुण मिळविले तर उदोजी मराठा संघाला दुसऱ्या सत्रातही दुहेरी आकडा गाठता आला नाही. फक्त सहा गुण घेता आले. अखेर ४०:११ अशा फरकाने अश्वमेघ संघाने उदोजी मराठा संघाला पराभूत केले.
उत्कृष्ट चढाई : अक्षय पवार (अश्वमेध रायडर्स)
उत्कृष्ट पकड : प्रतिक जगताप (एमव्हीपी उदोजी मराठा)
........
‘त्रिमूर्ती बॉईज’ने सपकाळ वॉरिअर्स चारली धूळ
‘सकाळ कबड्डी प्रीमियर लीग स्पर्धेच्या दुसऱ्या दिवसाचा आपला सलग दुसरा सामना खेळणाऱ्या त्रिमूर्ती बॉईज संघाने सपकाळ वॉरियर्सला अक्षरश: धूळ चारली. एकतर्फी झालेल्या या सामन्यात त्रिमूर्तीने तब्बल ६७ गुणांनी आपला विजय नोंदवून विजयी घौडदौड कायम राखली. सपकाळ वॉरिअर्स संघाने नाणेफेक जिंकली. परंतु त्याचा फायदा मात्र उठवता आला नाही. त्रिमूर्ती बॉईजच्या खेळाडूंनी पहिल्या सत्रात सपकाळचे तब्बल ४० खेळाडू बाद केले आणि तब्बल ५२ गुण घेत निर्णायक आघाडी घेतली हाेती. त्या तुलनेत सपकाळ वॉरियर्सला केवळ ६ गुण मिळविता आले. पहिल्या सत्रापासूनच एकतर्फी झालेल्या या सामन्याच्या दुसऱ्या सत्रातही त्रिमूर्ती बॉईजने ३० गुण मिळविले. एकतर्फी झालेल्या या सामन्यात त्रिमूर्ती बॉईजने ८२:१५ अशा गुणांसह सपकाळ वॉरियर्सचा तब्बल ६७ गुणांनी पराभव केला.
उत्कृष्ट चढाई : तेजस बोरसे (सपकाळ वॉरियर्स)
उत्कृष्ट पकड : अमित इंगळे (त्रिमूर्ती बॉईज)
........
चुरशीच्या सामन्यात ‘केबीएच’ने मारली बाजी
दुसऱ्या दिवसाच्या अखेरच्या सामन्यात सलग दुसऱ्या सामन्यात एमव्हीपी कर्मवीर संघाला चुरशीच्या सामन्यात अवघ्या १२ गुणांनी पराभूत व्हावे लागले. केबीएच योद्धा संघाने अत्यंत चपराईने हा सामना आपल्याकडे खेचून आणला. विशेषत: केबीएच संघाने पहिले सत्र गमविलेले असतानाही दुसऱ्या सत्रात आगेकूच करीत विजय मिळविला. पहिल्या सत्रात केबीएचने अवघे १२ गुण मिळविले होते. तर कर्मवीर संघाने ८ गुणांची आघाडी घेत २० गुण घेतले होते. परंतु कर्मवीर संघाला दुसऱ्या सत्रामध्ये ही आघाडी कायम राखता आली नाही. तर केबीएच संघाने दुसऱ्या सत्रात आक्रमक चढाई करीत २८ गडी बाद करीत ३६ गुण मिळविले. तर याच सत्रात कर्मवीर संघाला फक्त १६ गुण घेता आले. परिणामी केबीएच योद्धा संघाने कर्मवीर संघावर १२ गुणांनी मात करीत चुरशीच्या सामन्यात विजय नोंदविला. केबीएचने ४८ तर कर्मवीर संघाने ३६ गुण मिळविले होते.
उत्कृष्ट चढाई : प्रशांत पवार (केबीएच योद्धा)
उत्कृष्ट पकड : कुलदीप पाल (मविप्र कर्मवीर)