जिल्ह्यात ‘आमची अंगणवाडी, आमची जबाबदारी’ अभियान
(उपशीर्षक)
‘राष्ट्रीय पोषण माह’ उद्यापासून; पोषण, आरोग्य व बालविकासाचा जागर
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. ७ : बालक, गरोदर महिला आणि स्तनदा मातांच्या पोषणाबाबत जनजागृती करून सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी जिल्ह्यात ‘राष्ट्रीय पोषण माह २०२६’चे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागातर्फे राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमात ‘आमची अंगणवाडी, आमची जबाबदारी’ ही संकल्पना केंद्रस्थानी ठेवण्यात आली आहे.
जिल्ह्यातील ग्रामीण भागातील तीन हजार ४३५, तर शहरी भागातील ५०९, अशा एकूण तीन हजार ९४४ अंगणवाडी केंद्रांमधून पोषण, आरोग्य, स्वच्छता आणि बालविकासाचा संदेश तळागाळापर्यंत पोहोचविण्यात येणार आहे. राष्ट्रीय पोषण ९ सप्टेंबर ते ९ ऑक्टोबरदरम्यान राबविण्यात येणार आहे. यात बालकांना ताजा, गरम, स्वच्छ आणि पोषणमूल्ययुक्त आहार मिळावा, यासाठी आहाराची गुणवत्ता, स्वच्छता आणि साप्ताहिक मेनूनुसार आहारातील विविधतेसह स्थानिक पौष्टिक आहारावर भर देण्यात येणार आहे. हा कार्यक्रम ९ सप्टेंबर ते ९ ऑक्टोबरदरम्यान चार टप्प्यांत राबविला जाणार आहे.
कोट
पोषण आणि बालपणातील प्रारंभिक विकासासाठी अंगणवाडी केंद्रांना मध्यवर्ती ठेवून सामूहिक मालकीची भावना निर्माण करणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे. सर्वांनी अभियानात सक्रिय सहभाग नोंदवून अंगणवाडी केंद्रांच्या बळकटीकरणासाठी योगदान द्यावे.
- करिष्मा नायर, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, जळगाव
---
जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागातील सर्व ३९४४ अंगणवाडी केंद्रांच्या माध्यमातून आहारातील विविधता, पोषण, बालविकास आणि मातृ-बाल आरोग्याबाबत जनजागृती करून प्रत्येक लाभार्थ्यापर्यंत शासकीय योजनांचा लाभ पोहोचविण्यास महिला व बालविकास विभाग कटिबद्ध आहे.
- हेमंतराव भदाणे,
उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बालविकास), जिल्हा परिषद, जळगाव