टेबल टेनिस स्पर्धेसाठी
उद्या निवड चाचणी
नाशिक, ता. ७ः क्रीडा व युवक सेवा विभागातर्फे टेबल टेनिस या क्रीडा प्रकारासाठी पात्र खेळाडूंची निवड चाचणी आयोजित केली आहे. बुधवारी (ता.९) सकाळी दहाला पंचवटीतील स्व.मीनाताई ठाकरे विभागीय क्रीडा संकुल येथे ही निवड चाचणी होणार आहे.
या निवड प्रक्रियेत ११ वर्षांखालील मुला-मुलींना सहभागी होता येणार आहे. त्यानुषंगाने पात्र खेळाडूंनी निवड चाचणी टेबल टेनिससाठी पात्रता कागदपत्रांसह विभागीय क्रीडा संकुल येथे स्पर्धेच्या दिवशी उपस्थित राहावे, असे आवाहन क्रीडा व युवक सेवा विभागाच्या उपसंचालक स्नेहल साळुंखे यांनी केले आहे.
राज्यातील क्रीडा संस्कृतीला जागतिक स्तरावर नेण्यासाठी शासनाने ऑलिंपिक स्तरावर खेळल्या जाणाऱ्या बारा क्रीडा प्रकारांसाठी मिशन लक्ष्यवेध ही योजना कार्यान्वित केली आहे. या योजनेंतर्गत नाशिक जिल्ह्यास हाय परफॉर्मन्स सेंटर दिले आहे. याअंतर्गत टेबल टेनिस हा प्रकार कार्यान्वित आहे. या खेळांसाठी २० खेळाडूंची निवड निकषाच्या आधारे होईल. तसेच राज्यस्तरीय, राष्ट्रीय स्तरावरील व आंतरराष्ट्रीय स्तरावरील सहभाग प्राप्त खेळाडूंना प्राधान्य दिले जाईल.
निवड चाचणीसाठी खेळाडूंनी जन्म दाखला, शाळेचे बोनाफाईड प्रमाणपत्र, आधारकार्ड, मागील तीन वर्षांचे क्रीडा विषयक कामगिरीचे प्रमाणपत्र, पारपत्र साईजचे छायाचित्र, शाळा विद्यार्थ्यांचे बोनाफाईड प्रमाणपत्र तसेच पालकांचे संमतिपत्र आदी आवश्यक कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी गौतम अहुजा, जय मोडक यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.