महापालिकेच्या नव्या
विधिज्ञ पॅनेलसाठी अर्ज
जुन्या पॅनेलवर महासभेत झाले होते आरोप
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. ७ : न्यायालयीन प्रकरणांमध्ये महापालिकेची बाजू प्रभावीपणे मांडली जात नसल्याने पालिकेला आर्थिक फटका बसत असल्याच्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने नवीन विधिज्ज्ञ पॅनेल नियुक्त करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. पात्र व अनुभवी वकील तसेच विधी फर्मकडून अर्ज मागविण्यात आले असून, १८ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी सहापर्यंत अर्ज सादर करता येणार आहेत.
महापालिकेविरोधात विविध न्यायालयांमध्ये निकाल लागल्याने कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत असल्याचा मुद्दा मागील महासभेत नगरसेवकांनी उपस्थित केला होता. महापालिकेच्या वकिलांकडून न्यायालयीन प्रकरणांमध्ये प्रभावीपणे बाजू मांडली जात नसल्याचा आरोपही करण्यात आला होता. त्यानंतर महापौर दीपमाला काळे यांनी विद्यमान वकील पॅनेल बरखास्त करून नवीन पॅनेल नियुक्त करण्याची घोषणा केली होती. आता विधी विभागाने त्यानुसार कार्यवाही सुरू केली आहे. ‘विधीज्ञ पॅनेल नियुक्ती, न्यायालयीन प्रकरण व्यवस्थापन, मानधन व कार्यपद्धती नियमावली, २०२६ च्या तरतुदीनुसार ही निवड प्रक्रिया होणार आहे. न्यायालयनिहाय पॅनेल, पात्रता, अटी-शर्ती आणि आवश्यक प्रतिज्ञापत्राचा नमुना महापालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला आहे.
चौकट
अर्जांसाठी १८ पर्यंत मुदत
अर्ज सादर करण्यासाठी १८ सप्टेंबरपर्यंत मुदत असून, विहित मुदतीनंतर आलेले तसेच अपूर्ण अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. महापालिकेची न्यायालयीन बाजू सक्षमपणे मांडण्यासाठी पात्र कायदेतज्ज्ञांनी मुदतीपूर्वी अर्ज करावेत, असे अतिरिक्त आयुक्त शोभा बाविस्कर यांनी आवाहन केले आहे.