लोगो : कारने चिरडण्याचा प्रयत्न
तो ‘गुटखा’माफिया अद्याप मोकाटच
बऱ्हाणपूर-जळगाव राजरोस वावर; पोलिसांना मात्र सापडेना
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. ७ : शहरातील शिरसोली रोडकडून येणाऱ्या दुचाकीला सुसाट कारने धडक दिल्याची घटना २ जुलैला घडली होती. या अपघातात रविकुमार वासदेव राजपाल गंभीर जखमी झाले. ‘गुटखा’माफियांकडून रविकुमार यांना वाहनाखाली चिरडून मारण्याचा प्रयत्न असल्याचे समोर आले होते. याबाबत एमआयडीसी पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले असून, या गुन्ह्यातील मुख्य संशयित अद्यापही पोलिसांना सापडून आलेला नाही.
गुटखाविक्रेता व त्यांना पुरवठा करणाऱ्या गुटखामाफियांची टीप अन्न व औषध विभागाला दिल्याच्या संशयावरून सिंधी कॉलनीतील रविकुमार वासुदेव राजपाल (वय ४५) यांना सुसाट कारने चिरडून मारण्याचा प्रयत्न जुलैला सकाळी आठच्या सुमारास शिरसोली रस्त्यावर झाला. याप्रकरणी राजपाल यांच्या जबाबावरून एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल असून, गुन्ह्यात वापरलेली कार (एमएच १९, ईजी ४९५२) पोलिसांनी जप्त केली असून, ही कार गुटखा व्यावसायिक दीपक चेतवाणी चालवत असल्याचे जखमी रविकुमार राजपाल यांनी पोलिसांना सांगितले होते.
संशयित मिळेना
प्रकरणाचा उलगडा झाल्यानंतर घटनेच्या दिवशी कारचालक दीपक चेतवाणी तेव्हापासूनच फरारी आहे. घटनेला दोन महिने उलटूनही तो पोलिसांना मिळून येत नाही. मात्र, त्याचा शहरातील सिंधी कॉलनीत रात्रीच्या सुमारास मुक्त संचार असून तो सद्या गुटख्याच्या मोठ्या डिल्ससाठी बऱ्हाणपूर येथे थांबून महाराष्ट्रात गुटख्याचा माल पाठवत आहे.
चौकट
साथीदाराला अटक
गुन्ह्यात त्याच्यासोबत असलेला एका संशयित राजकिरण परदेशी याला एमआयडीसी पोलिसांनी १३ ॲागस्टला गावठी कट्ट्यासह अटक केली होती. त्यात त्याने पोलिसांना गुन्ह्याची कबुली देखील दिली आहे. संशयिताचा ठावठिकाणा देखील सांगितला होता. मात्र, गुन्ह्यातील मुख्य संशयित दीपक चेतवानी पोलिसांना अद्याप मिळून आलेला नाही.