29397
‘नवचेतना’, ‘पोषणदूत’ची दखल;
ओमकार पवार यांना गडकरी पुरस्कार
महिलांच्या सक्षमीकरणासह कुपोषण निर्मूलनातील कामाची नोंद
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता.११ : नाशिक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांना इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनच्या महाराष्ट्र प्रादेशिक शाखेचा प्रतिष्ठित एस. एस. गडकरी पुरस्कार २०२५-२६ जाहीर झाला आहे. ‘नवचेतना अभियान’ आणि ‘पोषणदूत’ या नावीन्यपूर्ण उपक्रमांची दखल घेत त्यांची या राज्यस्तरीय पुरस्कारासाठी निवड झाली. सोमवार (ता. २१) रोजी दुपारी दोन वाजता मंत्रालय ॲनेक्स, मुंबई येथील परिषद सभागृहात आयआयपीए महाराष्ट्र शाखेचे अध्यक्ष तथा राज्याचे माजी मुख्य सचिव स्वाधीन एस. क्षत्रिय यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण होणार आहे.
‘नवचेतना अभियाना’तर्गत जिल्ह्यातील एकल, विधवा, परित्यक्ता, घटस्फोटित आणि प्रौढ अविवाहित महिलांचे सर्वेक्षण करण्यात आले. यात एक लाख सहा हजार महिलांची माहिती संकलित करून तिचे वर्गीकरण व नकाशीकरण करण्यात आले. महिलांच्या गरजेनुसार त्यांना रोजगार, स्वयंरोजगार, शिक्षण, सामाजिक पुनर्वसन आणि बालसंगोपनाच्या योजनांशी जोडण्यात आले.
महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी ३७ बचत गटांच्या समूहांना शून्य व्याजदराने एक कोटी १८ लाख रुपयांचे कर्ज देण्यात आले. सामाजिक पुनर्वसनासाठी तीन मोफत आणि जातिनिरपेक्ष वधू-वर परिचय मेळावे घेण्यात आले. त्यातून सात पुनर्विवाह झाले. विधवांच्या सन्मानासाठी राबविलेल्या ‘सौभाग्य शपथपत्र’ उपक्रमातून ९१५ ग्रामपंचायतींनी विधवांबाबतच्या अनिष्ट प्रथा बंद करण्याचे ठराव केले.
कुपोषित बालकांची जबाबदारी अधिकाऱ्यांवर
‘पोषणदूत’ उपक्रमात प्रत्येक कुपोषित बालकाची जबाबदारी एका अधिकाऱ्यावर निश्चित करण्यात आली. बालकाचे वजन, औषधोपचार, लसीकरण, आहार तसेच कुटुंबाच्या अडचणींचा नियमित पाठपुरावा करण्यात आला. या उपक्रमातून एक हजार ९५४ कुपोषित बालकांचे नियमित निरीक्षण करण्यात आले. त्यापैकी ९८४ बालके सामान्य स्थितीत आली असून ६११ बालके तीव्र कुपोषणातून बाहेर आली आहेत.
विशेष म्हणजे या उपक्रमासाठी शासनाच्या तिजोरीवर कोणताही अतिरिक्त आर्थिक भार न टाकता अधिकाऱ्यांच्या वैयक्तिक उत्तरदायित्वातून बालकांचा पाठपुरावा करण्यात आला.