सेट परीक्षेची तारीख बदलली;
आता २५ ऑक्टोबरला होणार
---
तिसऱ्यांदा बदल; २६ जुलैपासून २५ ऑक्टोबरपर्यंत तीन वेळा फेरबदल
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. १४ : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे सहायक प्राध्यापकपदासाठी घेण्यात येणाऱ्या ४१ व्या महाराष्ट्र राज्यस्तरीय पात्रता परीक्षेच्या (सेट) तारखेत पुन्हा बदल करण्यात आला आहे. २७ सप्टेंबरला होणारी ही परीक्षा आता २५ ऑक्टोबरला घेतली जाणार असल्याचे विद्यापीठाने जाहीर केले. परीक्षेच्या तारखेत तिसऱ्यांदा बदल झाल्याने उमेदवारांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
महाराष्ट्र आणि गोव्यात ही परीक्षा घेतली जाते. तिचे संयोजन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे करण्यात येते. यासंदर्भात विद्यापीठाच्या सेट विभागाने नुकतेच परिपत्रक जारी करून परीक्षेच्या सुधारित तारखेची माहिती दिली आहे.
केंद्रीय लोकसेवा आयोगासह अन्य स्पर्धा परीक्षांचे वेळापत्रक नुकतेच जाहीर झाले आहे. तसेच, २५ सप्टेंबरला अनंत चतुर्दशी असल्याने परीक्षार्थींना परीक्षा केंद्रांवर पोहोचण्यासाठी प्रवासासह अन्य व्यावहारिक अडचणी निर्माण होण्याची शक्यता होती. या पार्श्वभूमीवर परीक्षेची तारीख बदलण्याबाबत विद्यार्थ्यांकडून निवेदने प्राप्त झाली होती. परीक्षार्थींचे शैक्षणिक हित आणि परीक्षा आयोजनातील सुसूत्रता लक्षात घेऊन विद्यापीठ प्रशासनाने परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.
तारखेत तिसऱ्यांदा बदल
पूर्वघोषित वेळापत्रकानुसार सेट परीक्षा सुरुवातीला २६ जुलैला होणार होती. मात्र, सीटीईटी आणि अन्य परीक्षांच्या तारखांशी ताळमेळ साधण्यासाठी ती प्रथम ६ सप्टेंबर आणि त्यानंतर २७ सप्टेंबरला निश्चित करण्यात आली. आता पुन्हा सुधारणा करून २५ ऑक्टोबर ही परीक्षा तारीख निश्चित करण्यात आली आहे. वारंवार तारखेत बदल होत असल्याने परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांना मनस्ताप सहन करावा लागतो.