फोटो आहे...
आईच्या आरोग्यासाठी धावतोय १२ ज्योतिर्लिंगांकडे!
पाच ज्योतिर्लिंगांचे दर्शन पूर्ण करून बिहारचा मोनू त्र्यंबकेश्वरमध्ये दाखल
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. १४ : आईचे उत्तम आरोग्य लाभावे, यासाठी मनात नवस धरला... आणि त्या संकल्पाला पावलांची साथ देत बिहारचा मोनू धावत निघाला. एक-दोन नव्हे, तर देशातील १२ ज्योतिर्लिंगांचे दर्शन धावत पूर्ण करण्याचा त्याचा निर्धार आहे. अंगातला थकवा झटकत, मैलोन्मैलांचा रस्ता तुडवत त्याने आतापर्यंत ८ हजार किलोमीटरहून अधिक प्रवास पूर्ण केला असून, पाच ज्योतिर्लिंगांचे दर्शनही घेतले आहे. आता त्याच्या या धावत्या यात्रेने महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेतले आहे.
या प्रेरणादायी प्रवासाचा पुढचा टप्पा सोमवारी मोनूने श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे गाठला. त्याचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. श्रद्धेने सुरू केलेल्या या धावत्या प्रवासामागची कहाणी ऐकून उपस्थितही भारावून गेले.यानंतर मोनूने सपकाळ नॉलेज हब येथील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. देशभरातील विद्यार्थ्यांसमोरील विविध प्रश्न, स्पर्धा परीक्षांमधील अनियमितता आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांशी त्याने मनमोकळा संवाद साधला. ‘ध्येय मोठे असेल तर वाट कितीही कठीण असली, तरी मेहनत आणि सातत्य सोडू नका,’ असा संदेश त्याने विद्यार्थ्यांना दिला.
त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त पुरुषोत्तम कडलग, कैलास मोरे आणि योगेश महाले यांनी मोनूचे स्वागत करून त्याच्या संकल्पाला शुभेच्छा दिल्या.
मोनूची ही यात्रा केवळ एका धार्मिक संकल्पाची पूर्तता करण्यासाठीची धाव नाही. आईच्या आरोग्यासाठी केलेली प्रार्थना, श्रद्धेची ताकद, ध्येयाप्रती असलेली जिद्द आणि शरीराची कमाल क्षमता यांचा हा अनोखा संगम आहे. हजारो किलोमीटरच्या या वाटचालीत प्रत्येक पाऊल त्याच्या आईसाठी आहे आणि प्रत्येक मैल त्याच्या संकल्पाला बळ देणारा आहे. त्यामुळेच मोनूची ही ‘धावती यात्रा’ देशभरातील तरुणांसाठी प्रेरणेचा नवा अध्याय ठरत आहे.
चौकट
महाराष्ट्रात चर्चेत!
आईच्या उत्तम आरोग्यासाठी नवस करत १२ ज्योतिर्लिंगांची यात्रा धावत पूर्ण करण्याचा संकल्प घेतलेला बिहारचा मोनू सध्या महाराष्ट्रात विशेष चर्चेत आहे. आतापर्यंत ८ हजार किलोमीटरहून अधिक अंतर कापत त्याने पाच ज्योतिर्लिंगांचे दर्शन पूर्ण केले आहे. श्रद्धेच्या जोरावर सुरू असलेली त्याची ही धावती यात्रा आता त्र्यंबकेश्वरमार्गे पुढे सुरू आहे.