अँकर
NSK26H30006/ NSK26H30008
नंदुरबार : मदुराईत सात वर्षांपूर्वीची स्वरूपसिंगची अवस्था. आपल्या घरी परतलेला आजचा स्वरूपसिंग (छायाचित्र ः सागर निकवाडे)
---
सोरापाडाचा बेपत्ता तरुण सात वर्षांनंतर घरी परतला!
अक्षया ट्रस्ट ठरली देवदूत : माता-पित्याच्या डोळ्यांत आनंदाश्रू
सकाळ वृत्तसेवा
नंदुरबार, ता. १८ : गेल्या सात वर्षांपासून बेपत्ता असलेला विवाहित तरुण आपल्या घरी परतला आहे. बेपत्ता मुलगा अचानक आपल्या घरी पोहचल्याने सोरापाडा गावात पाडवी कुटुंबीयांनी जणू दिवाळीच साजरी झाली. या वेळी वर्षानुवर्ष मुलाच्या भेटीची आस लावून बसलेल्या माता-पित्यांच्या डोळ्यांत आनंदाश्रुही दाटून आले. या तरुणाला त्याच्या कुटंबीयांपर्यंत पोहचविण्यात तमिळनाडूतील ‘अक्षया ट्रस्ट’ देवदूत ठरली आहे.
सोरापाडा (ता. अक्कलकुवा) येथील स्वरूपसिंग लालसिंग पाडवी हा तरुण सात वर्षांपूर्वी कोठली (ता. नंदुरबार) येथे आपल्या नातेवाइकांना भेटण्यासाठी गेला होता. त्यानंतर तो पुन्हा घरी परतलाच नाही. काही तास, काही दिवस वाट पाहिली. पण, स्वरूपसिंग घरी परतला नसल्याने कुटुंबीयांची चिंता वाढली. नातलगांनी त्याची सर्वत्र शोधाशोध केली. पोलिस ठाण्यांचे उंबरठे झिजवले. पण त्याचा तपास लागला नाही. तब्बल ७५ महिन्यांपासून कुटंबीय स्वरूपसिंगची प्रतीक्षा करीत होते.
कुठे गेला असेल, काय झाले असेल, काय खात असेल, कुठे झोपत असेल याबाबत आई-बापाला चिंता लागली होती. नेमकी कोणतीच माहिती मिळाली नसल्याने कुटुंबीय बेचैन झाले होते. कधीतरी माझा लेक नक्की घरी परत येईल... अशी आस लावून बसले होते. १६ सप्टेंबरला स्वरूपसिंग पुन्हा आपल्या घरी परतला. त्याला पाहताच आई-वडिलांचा ऊर भरून आला. या वेळी त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि डोळ्यांतील अश्रू सर्व काही सांगून जात होते.
मदुराईतील अक्षया ट्रस्टने दिला आधार
बेपत्ता झालेला स्वरूपसिंग तमिळनाडूतील मदुराई शहरात पोहचला होता. रस्त्याच्या कडेला बसलेल्या स्वरूपसिंगची अवस्था अत्यंत दयनीय झाली होती. त्याची प्रकृती खालावलेली होती. मानसिक स्थिती पूर्णपणे बिघडलेली असल्याने त्याला स्वतःचे नाव, गाव सांगता येत नव्हते. तेथील अक्षया ट्रस्टच्या कार्यकर्त्यांची बेवारस बसलेल्या स्वरूपसिंगवर नजर पडली. त्यांनी त्याला आधार देऊन त्याच्यावर औषधोपचार केली. महिनोमहिने त्याची काळजी घेतली. काही कालावधी गेल्यानंतर मानसिक प्रकृती स्थिर झाल्यावर स्वरूपसिंगला आपल्या घराची, गावाची आठवण येऊ लागली. अक्षया ट्रस्टच्या कार्यकर्त्यांनी त्याच्याकडून मिळालेल्या तुटपुंज्या माहितीच्या आधारे स्वरूपसिंगच्या मूळ गावाचा शोध सुरू केला. त्याचे नाव-गाव समजल्यानंतर स्वरूपसिंग सुखरूप त्याच्या घरी पोहचविण्यात आले आहे. तब्बल सात वर्षांनंतर आपल्या मुलाला भेटतांना आई-वडिलांच्या, भावा-बहिणीसह पत्नीच्या डोळ्यांतून आनंदाश्रू दाटून आले होते. या संपूर्ण प्रवासात देवदूतासारखी धावून आलेल्या ‘अक्षया ट्रस्ट’चे पाडवी कुटुंबाने आभार मानले आहेत.