जिल्ह्यात भेंडीचे क्षेत्र वाढले
कमी कालावधीत उत्पादन; शेतकऱ्यांची पसंती
सकाळ वृत्तसेवा
भुसावळ, ता. १९ : जिल्ह्यातील भेंडीचे आगार अशी ओळख असलेल्या एरंडोल व धरणगाव भागात भेंडीचे क्षेत्र वाढले आहे. कमी कालावधीत उत्पादन देणारे आणि पावसातही चांगले उत्पादन मिळणारे पीक म्हणून अनेक शेतकऱ्यांनी भेंडीला पसंती दिली आहे. यंदा भेंडीची बाजारातील आवक कायम आहे. मध्यंतरी दरात वाढ झाली होती; परंतु या वाढीचा लाभ सर्वच शेतकऱ्यांना मिळाला नाही. सध्या दरात चढ-उतार होत आहेत. मात्र, सणासुदीमुळे भेंडीला बाजारात उठाव आहे. एरंडोल तालुक्यातील खर्ची, खेडी, कढोली, धारागीर, एरंडोल, कासोदा, जवखेडा, उत्राण, तळई आदी भागांत भेंडीचे पीक घेतले जाते. तसेच धरणगाव तालुक्यातील पथराड, चोरगाव, चांदसर, दोनगाव, पाळधी, रेल, लाडली, भोकणी, फुलपाट, आव्हाणी आदी भागांत भेंडीची बारमाही लागवड केली जाते.
चौकट
जळगावचा बाजार प्रसिद्ध
जळगाव येथील भाजीपाल्याचा बाजार प्रसिद्ध आहे. या बाजारात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव, सिल्लोडसह धरणगाव, एरंडोल, चोपडा, यावल आदी भागांतूनही भाजीपाल्याची आवक होते. मात्र, सध्या भेंडीची आवक निम्म्यावर किंवा त्यापेक्षा कमी आहे. ऑगस्टमध्ये जळगावच्या बाजारात भेंडीची प्रतिदिन सरासरी २० क्विंटल आवक झाली होती. या महिन्यात मागील आठ दिवसांत ही आवक प्रतिदिन सरासरी २८ क्विंटल झाली आहे. सध्या मिळणारे दर परवडणारे नसल्याने शेतकऱ्यांनी भेंडीच्या व्यवस्थापनावरील खर्च कमी केला आहे.