NSK26H30110
फेकरी (ता.भुसावळ) : विकसित भारतासाठी नशामुक्त युवा, मिशन राईज कार्यक्रमात व्यसनमुक्तीची शपथ घेताना मान्यवरांसह विद्यार्थी.
---------
तरुणाईला योग्य दिशा देण्याची गरज
--
केदार बारबोले : महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना नशामुक्तीची शपथ
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. २० : प्रत्येकाच्या जीवनात शिस्तीला खूपच महत्त्व आहे. म्हणून आजच्या महाविद्यालयीन जीवनात व तारुण्यातील अफाट ऊर्जेला योग्य दिशा देणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन भुसावळचे उपविभागीय पोलिस अधिकारी केदार बारबोले यांनी केले.
केंद्रीय युवा व क्रीडा मंत्रालयाचे मेरा युवा भारत कार्यालय जळगाव, जिल्हा पोलिस प्रशासनातर्फे फेकरी (ता.भुसावळ) येथील श्रीसंत गाडगे बाबा अभियांत्रिकी महाविद्यालयात विकसित भारतासाठी नशामुक्त युवा व मिशन राईज कार्यक्रम शनिवारी (ता.१९) झाला, त्याच्या उद् घाटनप्रसंगी श्री. बारबोले बोलत होते.
संपूर्ण देशभरात मंत्रालयाच्या माध्यमातून नाशमुक्तीसंदर्भात युवकांत जागृती केली जात आहे. पोलिस प्रशासनातर्फे जिल्ह्यातून ड्रग्सचा समूळ नायनाट करण्यासाठी जिल्हाभरात मिशन राईज कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून हा कार्यक्रम झाला. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे अकॅडमिक समन्वयक तथा विभाग प्रमुख डॉ. गिरीश कुलकर्णी होते. प्रमुख पाहुणे म्हणून परिविक्षाधीन पोलिस उपअधीक्षक राहुल दरेकर, जिल्हा युवा अधिकारी अभिषेक चवरे, शहर पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक दिपाली जगताप, नशामुक्त मित्र कमलेश सोनवणे, प्रा. राम अग्रवाल उपस्थित होते.
उपनिरीक्षक जगताप यांनी प्रेझेंटेशनच्या माध्यमातून ड्रग्सबाबत शास्त्रीय माहिती देत त्याचे वैयक्तिक व सामाजिक जीवनावर होणारे दुष्परिणाम स्पष्ट केलेत. श्री. सोनवणे यांनी विद्यार्थ्यांना आपापल्या परिसरात नशामुक्त जळगाव घडविण्याच्या मोहिमेचे नेतृत्व करण्याचे आवाहन केले. त्यानंतर उपस्थितांना नशामुक्तीची शपथ दिली. याप्रसंगी नशामुक्ती क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या युवक-युवतींचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.