रिक्षाचालकाने प्रवाशाला
पंच्च्याहत्तर हजारास लुटले
कोयत्याने हल्ला ः दोघांविरोधात गुन्हा
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. २० : गुटखा खाण्याच्या बहाण्याने देवळाली गावानजिकच्या मुस्लिम कब्रस्तान परिसरात नेऊन रिक्षात बसलेल्या प्रवाशाला कोयत्याने मारून जखमी केले. त्याच्या अंगावरील सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह मोबाईल व फोनद्वारे आॅनलाइन पैसे घेत लुटमार केल्याचा प्रकार घडला. नाशिकरोड पोलिसात अज्ञात रिक्षाचालकासह त्याच्या साथीदाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भावेश अशोक बागूल (२९, रा शामवृंदावन अपार्टमेंट, मखमलाबाद लिंक रोड. मूळ रा. जालना) यांच्या फिर्यादीनुसार, गेल्या १६ तारखेला मध्यरात्री दीडच्या सुमारास ते नाशिकरोड रेल्वे स्थानकावरून रिक्षात बसले. रिक्षाचालकाचा एक साथीदार रिक्षात होता. दोघांनी संगनमताने गुटखा खाण्याचा बहाणा करीत रिक्षा विहितगावाजवळ असलेल्या सुन्नी मुस्लिम कब्रस्तान इदगाहजवळ असलेल्या निर्जनस्थळी घेऊन गेले.
भावेश यांना संशयित रिक्षाचालक व त्याच्या साथीदाराने अचानक शिवीगाळ सुरू करीत कोयता काढला. कोयत्याने भावेश यांच्या पायावर मारून दुखापत केली. संशयितांनी त्यांचा ३५ हजार रुपयांचा मोबाईल फोन, साडेपाच हजार रुपयांची चांदीची अंगठी, १५ हजारांची चांदीची चैन, १५ हजारांची सोन्याची कानातील बाळी असा ऐवज हिसकावून घेतला. फोन पेवरून साडेचार हजार रुपये ऑनलाईन त्यांच्या मोबाईलवर ट्रान्सफर करून घेतले. संशयितांनी असा एकूण ७५ हजार रुपयांचा ऐवज लुटला आणि पसार झाले. नाशिकरोड पोलिसात लुटीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, उपनिरीक्षक नेहेते हे तपास करीत आहेत.
---------------