NSK26H30197
जळगाव : सोनम मस्कर सोबत प्रशिक्षक दीक्षांत जाधव.
–––
आशियाई क्रीडा स्पर्धेत
दीक्षांत जाधव प्रशिक्षक
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. २१ : आंतरराष्ट्रीय नेमबाजी प्रशिक्षक दीक्षांत संजय जाधव हे भारतीय नेमबाजी संघासोबत प्रशिक्षक म्हणून कार्यरत आहेत. सध्या सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत त्यांच्या मार्गदर्शनाखालील खेळाडू भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करीत आहेत. श्री. जाधव हे नवी दिल्ली येथील डॉ. कर्णी सिंग शूटिंग रेंज येथे भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या अंतर्गत वरिष्ठ प्रशिक्षक म्हणून कार्यरत आहेत. जाधव यांच्या मार्गदर्शनाखालील खेळाडूंनी राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखालील सोनम मस्कर हिने आशियाई क्रीडा स्पर्धेत एअर रायफल टीम प्रकारात रौप्यपदक मिळवून उल्लेखनीय कामगिरी केली. तसेच एअर रायफल वुमेंसच्या अंतिम फेरीत पाचव्या क्रमांकावर राहत तिने आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे नाव उज्ज्वल केले.
याशिवाय, श्री. जाधव यांच्या मार्गदर्शनाखालील अनेक खेळाडूंनी आयएसएसएफ वर्ड कंप, वर्ड चॅम्पीयनशिप व एशियन चॅम्पीयनशिप तसेच इतर प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. या खेळाडूंनी विविध स्पर्धांमध्ये पदके मिळवत आणि उल्लेखनीय कामगिरी नोंदवत भारतीय नेमबाजीची गुणवत्ता अधोरेखित केली आहे.