पाळधीची विसर्जन मिरवणूक
चालली तब्बल आठ तास
सकाळ वृत्तसेवा
पाळधी (ता. धरणगाव), ता. २१ : येथील गणेश विसर्जन मिरवणूक तब्बल आठ तास चालली. शेवटच्या गणपतीचे विसर्जन रात्री दोनला झाले. या वेळी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता तर प्रताप पाटील व विक्रम पाटील यांनी मिरवणुकीतील प्रत्येक मंडळात आपला सहभाग नोंदवला.
येथे नेहमी प्रमाणे सातव्या दिवशी गणपतीचे विसर्जन करण्यात येते. ही विसर्जन मिरवणूक पाळधी बुद्रुक व पाळधी खुर्द या दोन्ही गावात वेग वेगळी निघते. या मिरवणुकीत सहभागी होण्यासाठी सर्व गणेश मंडळ श्रीराम मंदिराजवळ जमून तेथून मिरवणुकीला सुरुवात होते. या वेळी शिस्तबद्ध पद्धतीने व सर्व मंडळ एकाच रांगेत मिरवणुकीत सहभागी होत असतात. मात्र या वेळी ही परंपरा खंडित झाली. पाळधी बुद्रुक गावात ढोल ताशांच्या गजरात तर पाळधी खुर्द गावात डीजेच्या तालावर तरुणाई थिरकत होती. या वेळी गुलालाची उधळणही मोठ्या प्रमाणात झाल्याचे दिसून आले. या मिरवणुकीत प्रताप पाटील व विक्रम पाटील यांनी प्रत्येक मंडळात जाऊन ठेका धरून आपला सहभाग नोंदवला.
या वेळी चोपडा भागाचे पोलिस उपविभागीय अधिकारी सुनील पाटील, धरणगावचे पोलिस निरीक्षक उमाकांत गायकवाड, सहायक पोलिस निरीक्षक गणेश कोते यांच्यासह पाळधी व धरणगावचे पोलिस, दंगा नियंत्रक पथक, होमगार्ड यांच्यासह तब्बल १२५ कर्मचारी यांनी मिरवणूक शांततेत पार पाडण्यासाठी चोख बंदोबस्त ठेवला होता.