मद्यधुंद तरुणाकडून
पोलिसांवर दगडफेक
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. २२ : गणपती विसर्जन मिरवणूक संपल्यानंतर वाहतूक सुरळीत करत असलेल्या पोलिस पथकावर मद्यधुंद तरुणाने दगडफेक केल्याची घटना घडली. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिरसोली येथे पाचव्या दिवसाच्या गणेशाची विसर्जन मिरवणूक सुरू असताना रविवारी (ता.२०) रात्री पावणेअकराच्या सुमारास शिरसोलीतील गणपती विसर्जन मिरवणूक पार पडल्यानंतर शिरसोली-पाचोरा मुख्य रस्त्यावरील स्वस्तिक वेल्डिंग वर्कशॉपसमोर पोलिस बंदोबस्त तैनात होता. यावेळी संशयित महेंद्र पांडुरंग जाधव (मराठे) (वय ३५) हा दारूच्या नशेत रस्त्याच्या मधोमध वाहतुकीस अडथळा निर्माण होईल, अशा पद्धतीने चालला होता. पोलिस पथकाने त्याला रस्त्याच्या कडेने चालण्यास सांगितल्याचा राग येऊन संशयित महेंद्र याने पोलिसांना शिवीगाळ केली. तसेच त्याने पोलिसांना दुखापत करण्याच्या उद्देशाने त्यांच्यावर दोन वेळा दगड मारून फेकले. त्यानंतर अंगावर धावून जात मारहाण करण्याचा प्रयत्न केला व पोलिसांच्या शासकीय कामात अडथळा आणला. या प्रकरणी बंदोबस्तावर असलेले सहाय्यक फौजदार प्रदीप पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सोमवारी (ता.२१) एमआयडीसी पोलिस ठाण्यात संशयित महेंद्र जाधव याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक राजेंद्र उगले तपास करीत आहेत.