कुंभमेळा प्राधिकरण बनावट आदेश प्रकरणात
संशयितास एक दिवसाची पोलिस कोठडी
सकाळ वृत्तसेवा
जुने नाशिक, ता. १४ : नाशिक- त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरण आयुक्तांच्या नावाने कोट्यवधी रुपयांच्या प्रशासकीय मान्यतेचे बनावट आदेश तयार करण्याचा प्रकार घडला होता. या प्रकरणातील संशयितास भद्रकाली पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यास गुरुवारी (ता. १४) न्यायालयात हजर केले असता एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.
अर्थ व सांख्यिकी आयुक्तालयातील सहायक संशोधन अधिकारी तथा सध्या नाशिक- त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणात प्रतिनियुक्तीवर कार्यरत असलेले अधिकारी विशाल पाटील यांनी याबाबत भद्रकाली पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानुसार संशयित अभिषेक संजय झरे (संचालक व संस्थापक, इनोव्हेटिव्ह इंटेलिजन्स एआय ऑटोमेशन सोल्युशन्स एजन्सी, ठाणे) याच्याविरोधात कारवाई सुरू करण्यात आली आहे. बुधवारी (ता. १३) दुपारी भद्रकाली पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक वसंत पवार यांनी न्यायालयाच्या आदेशाने संशयित झरे याचा मध्यवर्ती कारागृहातून ताबा घेतला होता. गुरुवारी त्यास न्यायालयात हजर करण्यात आले.
संशयित झरे याने केलेल्या गुन्ह्यात त्याचे आणखी कोणी सहकारी आहेत का, बनावट सही-शिक्का कोठे बनविण्यात आला, बनावट आदेशाचा वापर करण्यात आला का, कुठल्या उद्देशाने हा सर्व प्रकार करण्यात आला, त्याचप्रमाणे आणखी कुठल्या कामांचे अशा प्रकारे बनावट आदेश काढले आहेत का याचीही चौकशी करण्यात येणार आहे. अशा विविध प्रकारची चौकशी करण्यासाठी न्यायालयाकडून त्याच्या पोलिस कोठडीची मागणी करण्यात आली. त्यानुसार न्यायालयाने त्यास एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे.