फोटो : B60888
---
गणेशोत्सवासाठी बाजारात खरेदीसाठी गर्दी
सकाळ वृत्तसेवा
जुने नाशिक, ता. १२ : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या बाजारपेठेत खरेदीसाठी नागरिकांचा महापूर आल्याचे पाहायला मिळाले. मुख्यत्वे रविवार कारंजा, मेन रोड आणि कानडे मारुती लेन या तीन प्रमुख बाजारपेठांमध्ये खरेदीची मोठी लगबग दिसून आली. शनिवारी सुट्टीचा दिवस असल्याने गर्दीत अधिकच भर पडली होती. रविवारीही बाजारात अशीच गर्दी राहण्याचा अंदाज विक्रेत्यांनी व्यक्त केला आहे.
सोमवारी (ता. १४) श्री गणेशोत्सवाला प्रारंभ होत असून सर्वांच्या लाडक्या बाप्पाचे १२ दिवसांसाठी आगमन होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे. घरोघरी आरास उभारण्यासोबतच सार्वजनिक मंडळांकडून देखावे साकारण्याची जोरदार तयारी सुरू आहे. गणरायाची स्थापना करताना केली जाणारी आरास, परिसर सजावटीचे साहित्य आणि पूजेच्या वस्तू खरेदी करण्यासाठी नागरिक शनिवारी घराबाहेर पडले होते. रिमझिम पाऊस सुरू असतानाही खरेदीचा उत्साह कायम होता. शनिवारी बहुतांश कंपन्या, शासकीय आणि खासगी कार्यालयांना सुट्टी होती. त्याचा फायदा घेत नागरिकांनी खरेदीसाठी बाजारात गर्दी केली. दोन दिवसांत घरगुती आरास पूर्ण करायची असल्याने शनिवारी सकाळपासूनच बाजारपेठ ग्राहकांनी गजबजली होती. प्लॅस्टिकची फुले, मकर, पडदे, पाट, चौरंग, रोषणाईचे साहित्य आणि कापड यांसारख्या विविध वस्तूंच्या माध्यमातून आरास केली जाते. यातील बहुतांश वस्तू कानडे मारुती लेन आणि मेन रोड परिसरात उपलब्ध आहेत. तर पूजेसाठी लागणारे साहित्य रविवार कारंजा परिसरात मिळत आहे. त्यामुळे या तीनही बाजारपेठांत मोठी गर्दी झाली होती. यातही कानडे मारुती लेनमध्ये सर्वाधिक गर्दी पाहायला मिळाली. बाप्पाची अत्यंत आकर्षक मूर्ती मिळावी, तसेच वेळेवर स्टॉलवर होणारी गर्दी आणि आवडीच्या मूर्तीची टंचाई टाळण्यासाठी अनेकांनी दोन दिवस आधीच गणेशमूर्तींचे बुकिंग केले आहे. त्यासाठी द्वारका, पौर्णिमा बसस्थानक, साईनाथ चौफुली, सिडको, गंगापूर रोड आणि पंचवटी परिसरातील मूर्ती विक्री स्टॉलवरही गणेशभक्तांची मोठी गर्दी दिसून आली.