पान दोन मेन
----------------
12105
राणेनगर : बोगदा जवळच्या समांतर पुलाचे सुरू असलेले काम.
राणेनगर समांतर पुलांचे काम अंतिम टप्प्यात
लवकरच पुल वाहतुकीसाठी खुले; कोंडीतून होणार सुटका
सकाळ वृत्तसेवा
इंदिरानगर, ता.२३ गेल्या वर्षभरापासून राणेनगर बोगद्याच्या दोन्ही बाजूला सुरू असलेले समांतर पुलांचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. पुढील काही दिवसात हे पूल वाहतुकीसाठी खुले केले जातील अशी माहिती प्रकल्प संचालक श्रीकांत ढगे यांनी दिली.
मुंबई आग्रा महामार्गावर असलेल्या राणेनगर या भागात असलेल्या बोगद्याजवळ दररोज सकाळी व सायंकाळी दोन्ही बाजूने वाहतूक कोंडी होत होती. यामुळे नाशिककडून पाथर्डी फाटा आणि पाथर्डी फाट्याकडून मुंबई नाका भागाकडे जाणाऱ्या वाहनचालकांना या कोंडीत फसावे लागत होते. मात्र, वाहतूक कोंडीचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली निघणार असून सध्या वासन नगर येथे टोयोटा शो रूम जवळ होणारी वाहतूक कोंडी देखील दूर होणार आहे.
राणेनगर आणि इंदिरानगर येथील बोगद्यामध्ये वाहतूक कोंडी फोडण्याच्या उद्देशाने माजी खासदार हेमंत गोडसे यांनी याठिकाणी समांतर पूल मंजूर करून आणले होता. यासाठी ४७ कोटी रुपयांचा निधीही मंजूर झाला. याच निधीतून राणेनगर येथील या कामासोबतच इंदिरानगर बोगदा रुंदीकरण आणि तेथील समांतर पुलांचे काम सुरू आहे. राणेनगर बोगदा येथील प्रमुख उंचीच्या रॅम चे काम जवळपास पूर्ण झाले आहे. सध्या जमिनीला जोडण्याच्या कामांनी गती घेतली आहे. समांतर पुलांमुळे पाथर्डी फाटा कडून मुंबई नाका कडे जाताना आणि परत येताना थेट जाणारी वाहने सरळ मार्गस्थ होणार असल्याने सिडको आणि इंदिरानगर भागातील अंतर्गत वाहतूक बोगद्यातून सुरळीतपणे आणि नियंत्रित होणार आहे. परिसरात शाळा असल्याने सकाळी आणि सायंकाळी हमखास कायमस्वरूपी येथे वाहतूक कोंडीचा त्रास नागरिक वर्षानुवर्षे सहन करत होते. मात्र आता हे काम पूर्ण होत आल्याने या समस्येतून कायमस्वरूपी सुटका होण्याचे अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
युद्धपातळीवर हे काम पूर्ण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. नियोजनानुसार काम पूर्ण झाले तर पुढील काही दिवसात हे दोन्ही समांतर पूल पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करणे शक्य होणार आहे.
श्रीकांत ढगे, प्रकल्प संचालक, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण