12639, 12638
पांडवलेणी: घटनास्थळी पोलिसांनी केलेली नाकेबंदी. दुसऱ्या छायाचित्रात १४ एप्रिल २०२५ च्या बातमीचे कात्रण.
जुन्या वादातून तरूणावर हल्ला
सकाळ वृत्तसेवा
इंदिरानगर, ता.३ : पांडवलेणीच्या पायथ्याशी शौकत फरीद शेख याच्यावर तिघांनी धारधार शस्त्राने केलेल्या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला आहे. मागील भांडणाची कुरापत काढून हा हल्ला झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार साहिल शेख, अरबाज शेख आणि साहिल सिंग यांनी मागील भांडणाची कुरापत काढून शौकतवर हल्ला केल्याचा संशय आहे. शौकत शेख याच्यावर गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल आहे.
१३ एप्रिल २०२५ ला रामदास बोराडे यांच्यावर रात्री १० ला प्राणघातक हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात बोराडे यांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात शौकत शेख याला पोलिसांनी अटक केली होती. नुकताच तो कारागृहातून बाहेर आला होता.
घटनेची माहिती मिळताच पोलिस उपायुक्त किशोर काळे, सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ.सचिन बारी, इंदिरानगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोहर कारंडे यांच्यासह पोलिसांचा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून तपासाला वेग दिला आहे.
--------
गेल्यावर्षीच्या वादातून हल्ला
१३ एप्रिल २०२५ ला पांडवलेणी भागात रात्री एका पार्टी दरम्यान कबुतरे दुसऱ्याच्या पेटीत ठेवण्यावरून रामदास बोराडे त्याचा चुलत भाऊ राजेश बोराडे आणि साहिल सिंग यांच्यासोबत शौकत शेखसह, नौशाद हाजी सय्यद, नफीज रफिक शेख, विजय माळेकर, रोहित पालवे, नितीन घुगे आदींचा वाद झाला होता. त्यावेळी शौकतने चिथावणी दिल्यानंतर विजय माळेकरने कंबरेला असलेल्या चाकूने रामदास ला भोसकले होते. या हल्ल्यात त्याचा मृत्यू झाला होता. तर राजेश बोराडे जखमी झाला होता. कदाचित या भांडणाची कुरापत काढूनच हा हल्ला झाला असावा अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.)