गोकुळ गितेंच्या रूपाने
तिसरा भुमिपुत्र आमदार
पिंपळगाव बसवंत ः राजकारणात पदाची महत्वाकांक्षा बाळगून प्रामामिक प्रयत्न अन् त्याला नशीबाची जोड असेल तर स्वप्नांपेक्षा ही कितीतरी अधिक मिळते. गोदाकाठचे भुमिपुत्र असलेले गोकूळ गिते यांच्याबाबतही असेच काहीसे घडले आहे. जिल्हा परिषद सदस्य होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या गिते यांच्या गळ्यात नाट्यमय घडामोडीनंतर विधानपरिषद आमदारपदाची माळ पडली. गिते यांची अनपेक्षीत राजकीय झेप निफाडचे राजकीय समीकरणे बदलणारी ठरणार आहे. गोकूळ गीते यांच्या रूपाने निफाड तालुक्याचा तिसरा भुमिपुत्र विधिमंडळात प्रतिनिधित्व करणार आहे.
गोदाकाठच्या शिंगवे गावचे गोकुळ गिते हे पिंपळगाव बाजार समितीच्या संचालकपदाच्या माध्यमातून निफाड तालुक्याच्या राजकीय पटलावर झळकले. सायखेडा गटातून जिल्हा परिषदेची पायरी चढण्याचा त्यांचा मानस होता. पण विधानपरिषद निवडणुकीत आलेले ट्विस्ट गितेच्या गळ्यात आमदार पदाची माळ टाकून गेले. गोदाकाठला थेट पहिल्यादाच आमदार लाभला आहे. आमदार सुहास कांदे हेही गोदाकाठचे भुमिपुत्र असले तरी ते नांदगावचे प्रतिनिधित्व करतात. आमदार दिलीप बनकर, सुहास कांदे व त्यात गोकूळ गिते असे निफाडचे तीन भुमिपुत्र विधीमंडळात नेतृत्व करताना दिसतील.