पिंपळगावला मोकाट
कुत्र्याचा बालिकेवर हल्ला
पिंपळगाव बसवंत, ता.२६ : चिंचखेड रस्त्यावरील आझाद नगरमध्ये दहा वर्षीय बालिकेवर मोकाट कुत्र्याच्या प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली. मोकाट कुत्र्यांवर नगरपरिषदेने कारवाई करावी,अशी मागणी नागरिकांकडुन होत आहे.
चिंचखेड रस्त्यावरील पालखेड कालव्या लगत असलेल्या आझाद नगर परिसरात अनुष्का नितीन निकम ही अंगणात खेळत होती. त्याचवेळी दहा बारा भटक्या कुत्र्यांच्या झुंडीने अनुष्कावर झडप घातली. अचानक झालेल्या हल्ल्याने अनुष्काने आरडाओरड करताच नागरिकांनी धाव घेत कुत्र्यांना पिटाळून लावले. तोपर्यंत कुत्र्यांनी तिच्या पाठ व मानेवर जखमा झाल्या आहेत. तिला उपचारासाठी शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले.
चार महिन्यापुर्वी मोकाट कुत्र्यांनी शहरात असाच धुडगुस घातला होता.नगरपरिषद प्रशासनाने त्यावर तात्काळ कार्यवाही करीत मोकाट कुत्र्यांची धरपकड व निर्बीजीकरण सुरू केले होते. नंतर ही मोहीम मात्र थंड पडल्याने भटक्या कुत्र्याची संख्या पुन्हा वाढली आहे. नितीन जहागीरदार यांनी ही कैफियत नगराध्यक्ष डॉ.मनोज बर्डे, नगरसेवक महेश अहिरे यांच्याकडे मांडली. डॉ.बर्डे, अहिरे यांनी याबाबत गंभीर दखल घेत कुत्र्याचा बंदोबस्त केला जाईल, असे आश्वासन दिले.