पान-३ मेन
PML26B10087
पिंपळगाव बसवंत ः जलशुध्दीकरण केंद्राची पाहणी करताना नगराध्यक्ष डाॅ. मनोज बर्डे, उपनगराध्यक्ष सतीश मोरे, राजेश पाटील व नगरसेवक.
------------
पिंपळगावला सोमवारपासून पाणीपुरवठा
------------
जलशुद्दीकरण केंद्रातील फिल्टर बदलणे सुरू, २० वर्षांनंतर प्रक्रिया ः ‘सकाळ’ च्या वृत्ताची दखल
----------
सकाळ वृत्तसेवा
पिंपळगाव बसवंत, ता.५ ः पिंपळगाव बसवंत शहरातील २.१३ एमएलडी क्षमतेच्या जलशुद्धीकरण केंद्रातील फिल्टर मीडिया तब्बल २० वर्षांनंतर बदलण्याचे काम शनिवार (ता.५) पासून सुरू करण्यात आले आहे. गढूळ व अनियमित पाणी पुरवठ्यामुळे पिंपळगावकर गेल्या दीड महिन्यापासून त्रस्त होते. याबाबत ‘सकाळ’ने पिंपळगावचा पाणी पुरवठा विस्कळीत या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध केले होते. प्रशासनाने दखल घेत त्यावर उपाययोजना सुरू केल्या आहेत. शनिवार, रविवार पाणीपुरवठा बंद राहणार असून सोमवारपासून तो पूर्ववत होईल.
------------
पिंपळगावकरांची तहान भागविणाऱ्या पालखेड धरणातून गढूळ पाणीपुरवठा होत असल्याने अवघा पन्नास टक्के पाणीपुरवठा होत होता. ऐन उन्हाळ्यात ओलेचिंब असणाऱ्या पिंपळगावकरांना पावसाळ्यात मात्र पाणीसमस्येला तोंड द्यावे लागत होते. जलशुद्धीकरण केंद्रातील फिल्टर मीडिया साधारणतः दहा वर्षांनी बदलणे आवश्यक असते. मात्र, उपलब्ध माहितीनुसार २००५-०६ मध्ये फिल्टर मीडिया बदलण्यात आला होता. त्यानंतर तब्बल वीस वर्षे तो बदलण्यात न आल्याने शहरातील काही भागांत गढूळ पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी नगरपरिषदेकडे प्राप्त झाल्या होत्या. याबाबत प्रशासनाने युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केले होते.
नागरिकांच्या तक्रारींची दखल घेत नगराध्यक्ष मनोज बर्डे, उपनगराध्यक्ष सतीश मोरे आणि नगरसेवकांनी जलशुद्धीकरण प्रकल्पाचा सखोल अभ्यास केला. त्यामध्ये जुन्या फिल्टर मीडियामुळे पाण्याच्या गुणवत्तेवर परिणाम होत असल्याचे निदर्शनास आल्याने तो तातडीने बदलण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्यानुसार आता फिल्टर मीडिया बदलण्याचे काम सुरू झाले आहे. फिल्टर बदलल्यानंतर पाण्यातील गढूळपणा कमी होऊन पाण्याची पारदर्शकता आणि गुणवत्ता सुधारण्यास मदत होणार आहे. प्रक्रियेमुळे नागरिकांना अधिक स्वच्छ आणि गुणवत्तापूर्ण पाणी उपलब्ध करून देण्याचा नगरपरिषदेचा प्रयत्न आहे. शनिवारी नगरपरिषदेच्या सर्व नगरसेवकांनी जलशुद्धीकरण प्रकल्पाला भेट देऊन सुरू असलेल्या कामाची पाहणी केली.
शिवसेनेचे युवानेते राजेश पाटील, गटनेते नीलेश पाटील, नगरसेविका कल्पना विधाते, सिंधूताई गांगुर्डे, मेघना पाटील, श्वेताताई मोरे, ज्ञानेश्वर जोगारे, सोनाली विधाते, तौसिफ मन्सुरी, माणिक वाघ, प्रशांत मोरे, सीमा कायस्थ, छायाताई राजेश पाटील, रेखा किरण लभडे, इम्रान कोतवाल, सुवर्णा वाघले, अनिता गांगुर्डे, नरेंद्र सैंदाणे, वैभव पाटील, रामकृष्ण खोडे होते.
---------------
१६-१ चौकट
सोमवारपासून शुद्ध पाणी मिळणार
फिल्टर मीडिया बदलण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर सोमवारपासून पिंपळगावकरांना शुद्ध पाणी उपलब्ध होईल, अशी माहिती नगराध्यक्ष मनोज बर्डे यांनी दिली. चिंचखेड रस्त्यावरील जलकुंभाला जलवाहिनी टाकून मागेल त्याला नळकनेक्शन देणार असल्याचे उपनगराध्यक्ष सतीश मोरे यांनी सांगितले.
------------