तरुणाच्या खुनाचा १२ तासांत उलगडा
संशयित मुंबईला पळण्याआधी जेरबंद; नऊ हजार रुपयांच्या वादातून घडला प्रकार
सकाळ वृत्तसेवा
सातपूर, ता. २२ : कामगारनगर येथील बेपत्ता तरुणाच्या खुनाचा उलगडा सातपूर पोलिसांनी अवघ्या १२ तासांत करत संशयिताला नाशिक रोड रेल्वेस्थानक परिसरातून ताब्यात घेतले. मुंबईकडे पसार होण्याच्या तयारीत असलेल्या संशयिताला शिताफीने पकडण्यात आले. वैष्णव मिलिंद शिंदे (वय २४, रा. कामगारनगर) असे खून झालेल्या तरुणाचे नाव असून, कृष्णा राकेश दुसाने (वय १९, रा. कामगारनगर) असे ताब्यात घेतलेल्या संशयिताचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वैष्णव शिंदे बेपत्ता असल्याची तक्रार २० जून रोजी सातपूर पोलिस ठाण्यात दाखल झाली होती. त्याचा शोध सुरू असतानाच २१ जून रोजी कामगार नगरातील इमारतीच्या टेरेसवर पोत्यात कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला. परिसरात दुर्गंधी पसरल्याने स्थानिकांना संशय आला आणि त्यांनी पोलिसांना माहिती दिली. घटनास्थळी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेट देऊन तपासाच्या सूचना दिल्या. त्यानंतर सातपूर पोलिसांचे गुन्हे शोध पथक व गुन्हे शाखा युनिट-२ यांनी तपासाची सूत्रे हाती घेतली.
तांत्रिक तपास, स्थानिक सूत्रांकडून मिळालेली माहिती आणि विविध धागेदोरे यांच्या आधारे पोलिसांनी कृष्णा दुसाने याच्यापर्यंत मजल मारली. तो नाशिक रोड रेल्वेस्थानक परिसरातून मुंबईला पळून जाण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले.
प्राथमिक चौकशीत संशयिताने गुन्ह्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. संशयिताने वैष्णवला हातउसने नऊ हजार रुपये दिले होते. पैसे परत मागितल्यानंतर वैष्णवकडून शिवीगाळ व मारहाणीच्या धमक्या मिळत असल्याचा दावा संशयिताने केला आहे. याच रागातून १९ जूनच्या मध्यरात्री त्याने वैष्णवच्या छातीवर व गळ्यावर धारदार चाकूने वार करून हत्या केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.
खून केल्यानंतर संशयिताने मृतदेह पोत्यात भरून दोन दिवस इमारतीच्या टेरेसवर लपवून ठेवला. योग्य संधी मिळाल्यावर मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा त्याचा प्रयत्न होता. मात्र, मृतदेहातून दुर्गंधी येऊ लागल्याने हा प्रकार उघडकीस आला.
या प्रकरणाचा तपास पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, पोलिस उपायुक्त किशोर काळे व सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रकाश अहिरे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आला. गुन्हे शाखा व सातपूर पोलिसांच्या संयुक्त पथकाने अत्यल्प वेळेत गुन्ह्याचा उलगडा करून संशयिताला अटक केल्याने पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक होत आहे.
चौकट
पोत्यातील मृतदेहामुळे उघड झाला खून
बेपत्ता तरुणाचा शोध सुरू असतानाच कामगार नगरातील इमारतीच्या टेरेसवर पोत्यात कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळला. दोन दिवस मृतदेह लपवून ठेवण्यात आल्याने परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली होती. याच दुर्गंधीमुळे स्थानिकांना संशय आला आणि त्यांनी पोलिसांना माहिती दिल्याने खुनाचे गूढ उकलण्यास मदत झाली.
SAT26B10190