फोटो : B10193
सातपूर : थ्री एंटरप्रायझेस या कंपनीला लागलेली आग.
--
औद्योगिक वसाहतीत बॅग कारखान्याला आग
साहित्य खाक; पाच लाखांचे नुकसान, जीवितहानी टळली
सातपूर, ता. २४ : सातपूर औद्योगिक वसाहतीतील ‘व्ही थ्री एंटरप्रायझेस’ या कंपनीला बुधवारी (ता. २४) सकाळी अचानक आग लागली. या दुर्घटनेत सुमारे पाच लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे; मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
येथील गणेशनगर रस्त्यालगत टीडीके (ईपकॉस) कंपनीसमोर व्ही थ्री एंटरप्रायझेस हा प्लांट असून, येथे टुरिस्ट बॅग उत्पादनाचे काम चालते. बुधवारी सकाळी कारखान्यातून अचानक धूर निघू लागल्याने परिसरात खळबळ उडाली. काही वेळातच धुराचे मोठे लोळ आकाशात दिसू लागल्याने परिसरातील नागरिक आणि कर्मचाऱ्यांमध्ये धावपळ उडाली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नगरसेविका अंकिता शिंदे, माजी नगरसेवक सलीम शेख आणि सामाजिक कार्यकर्ते अॅड. महेंद्र शिंदे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. कारखाना व्यवस्थापनाने नाशिक महापालिकेच्या अग्निशमन विभागाला पाचारण केल्यानंतर, अग्निशमन दलाच्या दोन बंबांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून आग आटोक्यात आणली. अग्निशमन दलाच्या या तत्परतेमुळे आग जास्त पसरली नाही आणि पुढील मोठा अनर्थ टळला. या आगीत कारखान्यातील उत्पादित साहित्य जळून खाक झाले असून, आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.