दोन कॉलमात घ्यावी
---------------------------
महत्वाची आवश्यक
----------------
बागलाण एज्युकेशन सोसायटीची
कार्यकारणी पाच वर्षांसाठी कायम
५१ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ठराव
सकाळ वृत्तसेवा
सटाणा, ता. १६ : येथील बागलाण एज्युकेशन सोसायटीच्या इंग्लिश मीडियम स्कूलच्या शैक्षणिक व भौतिक प्रगतीसाठी उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यमान संचालक मंडळालाच पुढील पाच वर्षांसाठी कायम ठेवण्याचा महत्त्वपूर्ण ठराव संस्थेच्या ५१ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत एकमताने मंजूर करण्यात आला. संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी (ता. १३) संस्थेच्या सभागृहात उत्साहपूर्ण व शांततेच्या वातावरणात झाली.
सभेच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष विश्वास चंद्रात्रे होते. या ठरावामुळे विश्वास चंद्रात्रे यांच्या नेतृत्वाखालील कार्यकारणीने हॅट्ट्रिक केली असून, त्यांना सलग तिसऱ्यांदा पाच वर्षांसाठी काम करण्याची संधी मिळाली आहे.
सुरुवातीस प्रास्ताविक व मागील सभेच्या इतिवृत्ताचे वाचन करण्यात आले. संस्थेचे शाळा विकास अधिकारी नानासाहेब सोनवणे यांनी अजेंड्यावरील विषय सभेसमोर मांडले. यावेळी झालेल्या चर्चेत डॉ. विश्राम निकम, सुधाकर भामरे व ॲड. सतीश चिंधडे यांनी सहभाग घेतला. चर्चेनंतर अजेंड्यावरील सर्व विषयांना सभासदांनी एकमताने मंजुरी दिली. संस्थेचे सभासद सुरेश पाटील यांनी विद्यमान कार्यकारणीच पुढील पाच वर्षांसाठी कायम ठेवण्याचा ठराव मांडला. या ठरावाला रमेश देवरे, अंबादास कोठावदे व पी. टी. सोनवणे यांनी अनुमोदन दिले. कार्यकारणीत आवश्यकतेनुसार फेरबदल करण्याचा अधिकार कार्यकारणीला देण्यात आला.
त्यानुसार अध्यक्षपदी विश्वास चंद्रात्रे, उपाध्यक्षपदी जिभाऊ खंडू सोनवणे व ॲड. नितीन चंद्रात्रे, सचिवपदी अनिल राका, सहसचिवपदी संजय ब्राह्मणकर आणि खजिनदारपदी शरद ततार हे कायम राहणार आहेत.सभेत संस्थेच्या शैक्षणिक व भौतिक प्रगतीचा आढावा पीपीटीद्वारे सादर करण्यात आला. शाळेची गुणवत्ता वाढविण्यासाठी विशेष परिश्रम घेणाऱ्या शिक्षकांचे कौतुक करून अभिनंदन करण्यात आले. ॲड. नितीन चंद्रात्रे व जिभाऊ सोनवणे यांनी संस्थेच्या भावी वाटचालीबाबत मनोगत व्यक्त केले. अध्यक्ष विश्वास चंद्रात्रे यांनी उपस्थितांचे आभार मानले.