00482
पुनम निरभवणे
पूनमची मृत्यूशी झुंज अपयशी
दहा दिवसांनी उपचारादरम्यान मृत्यू
सकाळ वृत्तसेवा
ठेंगोडा, ता. १८ : दहा दिवसापूर्वी अपघातात जखमी झालेल्या पुनम निरभवणे (वय २२) हिचा दहा दिवसांनी उपचारादरम्यान मृत्यू झाला. पुनमच्या मृत्यूमुळे मृत्यूशी सुरू असलेली झुंज अखेर अपयशी ठरली.
पूनम हिने बारावीचे शिक्षण पूर्ण करून नर्सिंगचा कोर्स केला होता. ती मालेगाव येथे नर्सिंगच्या मुलाखतीसाठी जाणार होती. मात्र, बस थांब्यास बस थांबत नसल्याने पूनमचा भाऊ अनुराग हा तिला लोहोणेर येथे सोडविण्यासाठी दुचाकीवरून निघाला असताना गावातील हनुमान मंदिराजवळ त्यांच्या दुचाकीला पाठीमागून धुळे-साक्री बस (एमएच २० बीएल ३१२६) जोराची धडकली. यात पुनम जखमी झाली असता तिस नाशिक येथील खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. गेल्या दहा दिवसांपासून तिच्यावर उपचार सुरू होते. मात्र, तिचा अखेर उपचारादरम्यान मृत्यू झाला. एका निष्पाप मुलीचा जीव गेल्याने एस. टी.महामंडळ व सुरू असलेल्या हायवे काम करणारे कंपनी विषयी नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
दरम्यान, गावालगतच्या महामार्गावर वारंवार अपघात होत असून,गतिरोधक, झेब्रा क्रॉसिंग आणि योग्य ठिकाणी बस थांबा फलक यासारख्या आवश्यक उपाययोजना करण्यासाठी ग्रामस्थ सतत पाठपुरावा करत असून या कामाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. पूनमच्या मृत्यूने या गरीब कुटुंबाला बस महामंडळाकडून मदत मिळावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा संतप्त नागरिकांनी दिला आहे.