YEO26B25297
येवला : गटारीचे पाणी जाणाऱ्या पाईपमध्ये अडकलेले पाणी. दुसऱ्या छायाचित्र पटांगणात रस्त्यावर साचलेले पाण्याची डबके.
-----------------
शनी पटांगणात सांडपाण्याचे साचले तळे!
येवला : प्लास्टिक कचऱ्यामुळे गटार तुंबली; पादचाऱ्यांचे हाल
--------------
सकाळ वृत्तसेवा
येवला, ता.१५ : सांडपाण्याच्या गटारीत प्लास्टिक तुंबून आणि रस्त्यावर आल्याने शहरातील सर्वाधिक वर्दळीच्या शनी पटांगणात मोठे तळे साचले आहे. मुख्य रस्त्यावरच गटारीचे पाणी साचल्याने शहरासह ग्रामीण भागातून येणाऱ्या नागरिकांचे मोठे हाल झाले. दरम्यान, नगरपालिका प्रशासनाला माहिती मिळताच स्वच्छता कर्मचाऱ्यांनी धाव घेत पाण्याला वाट करून दिली.
शहराच्या चारही बाजूने जाणारे- येणारे नागरिक शनिपटांगणातून जातात. शिवाय शनिमंदिर, स्टेट बँक, फळ व भाजीपाला बाजार सर्व काही याच ठिकाणी असून येथूनच बसस्थानकाकडे रस्ता जातो, त्यामुळे येथे दिवसभर मोठी गर्दी असते. अचानक गटार तुंबल्याने घाण पाणी थेट बँकेच्या मुख्य प्रवेशद्वारासमोरून वाहू लागले. यामुळे पायी चालणाऱ्यांच्या अंगावर वाहनांमुळे पाणी उडण्याचे प्रकार घडले. दुर्गंधीमुळे व्यापारी आणि ग्राहक हैराण झाले होते.
घटनेची माहिती मिळताच नगरपालिकेच्या स्वच्छता विभाग तसेच माझी वसुंधरा व स्वच्छता विभागाचे समन्वयक संदीप बोधरे यांनी तातडीने स्वच्छता कर्मचाऱ्यांचे पथक घटनास्थळी रवाना केले. कर्मचाऱ्यांनी अथक प्रयत्न करून तुंबलेली गटार मोकळी केली, त्यानंतर रस्त्यावरून वाहणारे पाणी थांबले आणि नागरिकांनी सुटकेचा निःश्वास टाकला.
गटार तुंबण्यामागे प्लास्टिक कचरा हेच मुख्य कारण असल्याचे समोर आले आहे. नागरिक आणि व्यापाऱ्यांकडून गटारीत मोठ्या प्रमाणावर प्लास्टिक टाकले जाते, जे काँक्रिटच्या कामात अडकून पाण्याचा प्रवाह रोखते. सुमारे तीन फूट व्यास असलेल्या या गटारीच्या पाईपमध्ये अटकलेल्या प्लॅस्टिकमुळे गटार तुंबून पाणी रस्त्यावर आल्याचे स्थानिकांनी सांगितले. घाण पाण्याचे तळे साचल्याने त्यातूनच नागरिकांना वाट शोधावी लागली.
-----------------