अँकर
--
फोटो ः 25724
अंगणगाव : हक्क समन्वय समितीच्या जिल्हा बैठकीत मार्गदर्शन करताना डॉ. चारुदत्त अहिरे. व्यासपीठावर अर्जुन कोकाटे व पदाधिकारी.
---
शाळा-महाविद्यालयांतून संविधानाचे शिक्षण देणे गरजेचे
डॉ. अहिरे : ‘समता’मध्ये संविधान हक्क समन्वय समितीची जिल्हा बैठक
सकाळ वृत्तसेवा
येवला, ता. २४ : भारतीय संविधानातील मूलभूत हक्क, कर्तव्ये आणि विविध तरतुदींचे शिक्षण शाळा व महाविद्यालयांमधून दिल्याशिवाय विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीय एकात्मता आणि सामाजिक न्यायाची भावना पोहोचणार नाही, असे प्रतिपादन संविधान चळवळीतील डॉ. चारुदत्त अहिरे यांनी केले.
--
येथील समता प्रतिष्ठान संस्थेच्या अंगणगाव येथील डॉ. जगन्नाथ वाणी सभागृहात सुजाण नागरिक मंचांतर्गत ‘संविधान हक्क समन्वय समिती’ची जिल्हा बैठक पार पडली. या बैठकीत मुख्य मार्गदर्शक म्हणून डॉ. अहिरे बोलत होते. बैठकीच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रसेवा दलाचे माजी कार्याध्यक्ष अर्जुन कोकाटे होते. प्रारंभी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.
डॉ. अहिरे म्हणाले की, संविधानातील समाजवाद, धर्मनिरपेक्षता व लोकशाही या मूल्यांचा प्रसार करण्यासाठी आणि विद्यार्थ्यांमध्ये समता रुजवण्यासाठी अभ्यासक्रमातच संविधानाला प्राधान्य मिळायला हवे. संविधानाच्या अध्यापनामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक व राजकीय अधिकारांची जाणीव होईल, तसेच कर्तव्यांचीही प्रेरणा मिळेल. याप्रसंगी सुजाण नागरिक संघाचे जिल्हाध्यक्ष शिवदास म्हसदे, प्रा. अर्जुन कोकाटे व अजहर शहा यांचीही भाषणे झाली.
यावेळी राजकुमार सावंत, सुभाष लोकरे, मिलिंद तेलुरे, रामभाऊ केदारे, आप्पासाहेब शिंदे, निखिल संसारे, हेमंत पाटील आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.
--
येवला तालुका कार्यकारिणी घोषित
या बैठकीत संविधान समन्वय समितीच्या येवला तालुका कमिटीची नवीन कार्यकारिणी एकमताने निवडण्यात आली. यामध्ये तालुकाध्यक्षपदी युवा कार्यकर्ते अजहर शहा, तर कार्याध्यक्षपदी दिनकर दाने यांची निवड करण्यात आली. याशिवाय कायदेशीर सल्लागार म्हणून ॲड. समीर देशमुख, सामाजिक संस्था संवाद प्रमुख म्हणून जमील अन्सारी, मुख्य विभाग संघटक म्हणून प्रवीण खळे, खजिनदार म्हणून रामनाथ पाटील आणि तालुका सचिवपदी बाबासाहेब कोकाटे यांची निवड झाली.
------