तो आला अन्‌ एक लाख रुपये देऊन गेला!

Money
MoneySakal
Summary

देणाऱ्याचे हात हजारो दुबळी माझी झोळी, या पंक्तींचा प्रत्यय देणाऱ्या घटना नेहमीच सुखावह ठरतात. असाच एक अनुभव येथे नुकताच आला असून, राजस्थानमधील एका व्यापाऱ्याने कोविड-१९ जननिधीसाठी तब्बल एक लाख रुपयांची देणगी दिली

बोरगाव (जि. नाशिक) : देणाऱ्याचे हात हजारो दुबळी माझी झोळी, या पंक्तींचा प्रत्यय देणाऱ्या घटना नेहमीच सुखावह ठरतात. असाच एक अनुभव येथे नुकताच आला असून, राजस्थानमधील एका व्यापाऱ्याने कोविड-१९ जननिधीसाठी तब्बल एक लाख रुपयांची देणगी दिली. (trader donated rs 1 lakh for covid-19 relief fund nashik news)

कोरोना महामारीच्या काळात मदतीसाठी केलेल्या निधी संकलनाच्या आवाहनास भरघोस प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे आरोग्याच्या अनेक सुविधा उपलब्ध करून देण्यास हातभार लागत आहे. साधारण १९५४ च्या आसपास सिरियारी (ता. मारवाड, जि. पाली, राजस्थान) या छोट्याशा गावातून सोहनदास वैष्णव व त्यांच्या पत्नी शांतिदेवी हे व्यापारी दांपत्य व्यापारानिमित्त येथे आले होते. हे कुटुंब पुढे उंबरठाण येथे स्थायिक झाले. सध्या वैष्णव कुटुंबीय गुजरात सीमेवरील निंबारपाडा येथे व्यवसाय करीत असून, त्यांच्या पुढील पिढीतील गोपाळदास वैष्णव यांनी वडील (कै.) सोहनदास वैष्णव यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ सुरगाणा कोविड-१९ जननिधीत रुग्णांच्या सेवेसाठी एक लाख रुपयांचा धनादेश तहसीलदार किशोर मराठे यांच्याकडे सुपूर्द केला. दीड वर्षापासून व्यवसाय बंद असूनही, निधी दिल्याने वैष्णव कुटुंबीयांचे सर्वत्र कौतुक होत आहे. या कुटुंबाने दुष्काळ उपासमारीच्या काळात आदिवासी समाजासाठी यापूर्वीही अनेक वेळा मदतीचा हात पुढे केला आहे. गोपाळदास वैष्णव यांनी जिल्हा परिषदेच्या गरजू विद्यार्थ्यांना लेखनसाहित्य, बाक दिले आहेत.

‘कोविड देवदूत मदत निधी’

अतिदुर्गम तसेच आर्थिक परिस्थिती चांगली नसतानाही तालुक्यातील शिक्षक, शिक्षण विभाग, कृषी सहाय्यक, ग्रामसेवक, पंचायत समितीचा महसूल विभाग यांनी एकत्र येत कोविड जननिधीच्या माध्यमातून सुरगाणा रुग्णालयात ३० ऑक्सिजन खाटांची उभारणी केली आहे. अनेक दानशूरांकडून वेळीच मदतीचा हात मिळाल्याने रुग्णांच्या नातेवाइकांना ऑक्सिजन खाटांसाठीची धावपळ थांबली आहे. सोशल मीडियावरील ‘कोविड देवदूत मदत निधी’ या समूहाच्या माध्यमातून रामभाऊ थोरात, भगवान आहेर, ग्रामसेवक वसंत भोये, एकनाथ बिरारी, रतन धूम, डॉ. सुरेश पांडोले, डॉ. दिनेश चौधरी, डॉ. कमलाकर जाधव, डॉ. प्रवीण पवार, कृषी सहाय्यक गुलाब भोये, भास्कर चौधरी, शिक्षक पांडुरंग पवार, तुकाराम अलबाड, मनोहर चौधरी, भास्कर बागूल, एन. एस. चौधरी, नाना ढुमसे, केशव महाले, रतन चौधरी, देवीदास देशमुख, पांडुरंग वाघमारे, तुकाराम भोये, मोतीराम भोये, सुधाकर भोये, राजेंद्र गावित, राजू चौधरी आवाहन करीत असून, दानशूरांकडून मिळत असलेल्या उत्तम प्रतिसादामुळे या खात्यात लाखो रुपये जमा झाले आहेत.

आमचे कुटुंब सुमारे सत्तर वर्षांपासून अतिदुर्गम भागातील आदिवासी बांधवांसमवेत राहत आहे. त्यामुळे आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो, या कृतज्ञ भावनेने, आपल्या कमाईतील काही हिस्सा गोरगरीब रुग्णांच्या सेवेकरिता कठीण प्रसंगात उपयोग व्हावा यासाठी मदतीचा हात पुढे केला आहे.

-गोपाळदास वैष्णव, व्यापारी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com