Nashik Crime News : वाहतूक पोलिसाला धक्काबुक्की; आरोपीला कोर्ट उठेपर्यंतची शिक्षा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

crime News

Nashik Crime News : वाहतूक पोलिसाला धक्काबुक्की; आरोपीला कोर्ट उठेपर्यंतची शिक्षा

नाशिक : वाहतूक पोलिसाला धक्काबुक्की केल्याप्रकरणी छोटा हत्ती वाहनचालकासह त्याच्या दोघा साथीदारांना जिल्हा न्यायालयाने कोर्ट उठेपर्यंतची शिक्षा व ७ हजार रुपयांच्या दंड सुनावला. सदरील घटना गेल्या १३ जुलै २०१४ रोजी गंगापूर नाक्यावरील इंद्रप्रस्थ हॉलजवळ घडली होती. (Traffic police beaten up Accused sentenced till court Nashik Crime News)

शहर वाहतूक शाखेचे कर्मचारी जी. एस. महाले, त्यांचे सहकारी एस. जी. लोंढे हे १३ जुलै २०१४ रोजी सकाळी ८ ते रात्री ९ वाजेपर्यंत जुना गंगापूर नाका येथे रहदारी नियंत्रणाच्या कर्तव्यावर होते. सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास जेहान सर्कलकडून जुना गंगापूर नाक्याकडे छोटा हत्ती टेम्पोवरील (एमएच १५ डीके २६३०) आरोपी चालक सचिन जगन्नाथ वाकचौरे (३६, रा. विजय चौक, पंचवटी) याने वेगाने गाडी चालवून नेली.

महाले आणि लोंढे यांनी चालकाला थांबण्याचा इशारा केला. मात्र, चालकाने प्रमोद महाजन गार्डनकडे पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे महाले व लोंढे यांनी त्याचा पाठलाग करून इंद्रप्रस्थ हॉलसमोर त्याला थांबविले.

हेही वाचा : देशातले ३२ म्युच्युअल फंडांचं व्यवस्थापन आहे महिलांच्या हाती...

त्यावेळी सचिन वाकचौरे याच्यासह गाडीत मागे बसलेले मंगेश सुरेश जाधव (१८, रा. दत्तनगर, पंचवटी), सुरेश शंकर गुनगुने (२१, रा. विजय चौक, दत्तनगर, पंचवटी) यांना राग आल्याने महाले यांच्या मोटारसायकलला लाथा मारून खाली पाडली व त्यांना धक्काबुक्की केली.

या प्रकरणात सरकारवाडा पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्याच्या सुनावणीत मंगळवारी (ता.१४) जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एम. ए. शिंदे यांनी आरोपींना शिक्षा सुनावली. या खटल्यात सरकारी पक्षातर्फे सहायक सरकारी अभियोक्ता आर. एम. बघडाणे यांनी कामकाज पाहिले. तर, तत्कालिन उपनिरीक्षक एस. ई. कांबळे यांनी तपास केला.