आदिवासी बांधवांचा मूलभूत समस्यांशी झगडा..! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आदिवासी बांधवांचा मूलभूत समस्यांशी झगडा..!

आदिवासी बांधवांचा मूलभूत समस्यांशी झगडा..!

चोपडा, (जि.जळगाव) : देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत असताना सीमाभागातील आदिवासी अजूनही मूलभूत समस्यांशी झगडत आहेत. राज्य शासन, जि. प.सारख्या स्थानिक स्वराज्य संस्था या समस्यांकडे पाहायलाही तयार नाहीत, अशी भावना चोपडा तालुक्यात मध्य प्रदेश सीमेवर असलेल्या दुर्गम पाड्यातील आदिवासींची आहे. चांगल्या सुविधांसाठी मध्य प्रदेशात जाण्याची तयारी त्यांनी केली आहे.

चोपड्याच्या उत्तर भागात सातपुडा पर्वत रांग म्हणजे महाराष्ट्र व मध्य प्रदेशाची सीमा आहे. या सीमेवर महाराष्ट्रातील ३२ आदिवासी गावे, वाड्या-वस्त्या आहेत. या सीमेवरून अनेर नदी वाहते. स्वातंत्र्य मिळून साडेसात दशके उलटली तरीही रस्ते, वीज, पाणी, आरोग्य, बस सेवा, अशा मूलभूत सुविधा येथील काही वाड्या-वस्त्यांवर पोहोचलेल्या नाहीत. सातपुडा पर्वत रांगांमधील उत्तमनगर, मोरचिडा, सत्रासेन अमलवाडी उमर्टी, आदी ३२ गावांमध्ये आदिवासी विखुरलेले आहेत.

पुलाची मागणी धूळखात

महाराष्ट्र व मध्य प्रदेश यांच्या सीमा जोडणाऱ्या कर्जाणे ते धवलीदरम्यानच्या रस्त्यावर पुलाची मागणी तब्बल १२ वर्षांपासून केली आहे. थेट राष्ट्रपती, मुख्यमंत्री, लोकप्रतिनिधी यांच्याकडे मागणी करूनही अद्याप कार्यवाही होत नसल्याने प्रस्ताव धूळखात पडून असल्याचे माजी सरपंच प्रकाश बारेला यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.

मूलभूत सुविधा नसताना गावपाड्यांचा विकास तर दूरच राहिला. वर्षानुवर्षे हीच स्थिती असेल तर नदी ओलांडून पलीकडील राज्यात चांगल्या सुविधा मिळत असतील तर आम्ही तेथे जाऊ, अशी ग्रामस्थांची भावना आहे.

- प्रकाश बारेला, माजी सरपंच, कर्जाणे (ता.चोपडा)

काय आहेत समस्या?

नदी ओलांडल्यावर नेटवर्क

राज्याच्या सीमेवरील या पाड्यांवर मोबाईल नेटवर्कही मिळत नाही. दोन्ही राज्यांच्या मधील अनेर नदी ओलांडल्याबरोबर नेटवर्क मिळते. तंत्रज्ञानाच्या दृष्टीनेही हा फरक असल्याचे ग्रामस्थ सांगतात.

एसटी पोचलीच नाही

देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना अजूनही काही आदिवासी भागातील वाड्या वस्त्यात एसटी पोचली नाही. आदिवासींना पायपीट करीत यावे लागते. घोडाचापर, गोमाल, गौऱ्यापाडा, यासह नवाड भागातील आदिवासींपर्यंत एसटी पोचू शकलेली नाही.

रस्ते नाहीत.. वाट बिकट

पक्के रस्ते नाहीत. साधे पायी चालता येत नाही मग वाहन कुठून जाणार.? शाळेपर्यंत जाण्यास रस्ते नाहीत, दळणवळणाची साधनेही नाहीत. रुग्णवाहिका पोचू शकत नसल्याने गरोदर माता, स्तनदा यांना वेळेवर सेवा मिळत नाहीत. लसीकरणासाठी अनेक अडचणी येतात. नवाड भागात तर रस्तेच नाहीत.