रोकडोबा फाट्यावर मजुरांची पिक-अप उलटली
पाच गंभीर, ४० ते ४५ मजुरांना दुखापत; चारवर्षीय बालकाचाही समावेश
सकाळ वृत्तसेवा
कळवण, अभोणा, ता. १७ : गुजरात राज्यातील भीलमाळ येथून कळवण परिसरात मजुरीसाठी कामगारांना घेऊन येणारी पिक-अप शनिवारी (ता. १७) सकाळी साडेआठच्या सुमारास रोकडोबा फाटा (कनाशी) येथे उलटल्याने भीषण अपघात घडला. या दुर्घटनेत पाच मजूर गंभीर झाले असून, सुमारे ४० ते ४५ मजुरांना दुखापत झाल्याची प्राथमिक माहिती आहे. जखमींमध्ये महिला मजुरांची संख्या अधिक असून, चारवर्षीय बालकही जखमी झाला आहे.
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, कनाशीकडे भरधाव येणाऱ्या दोन पिक-अप वाहनांमध्ये पुढे जाण्याची चढाओढ सुरू होती. याचदरम्यान एका पिक-अपवरील चालकाचे नियंत्रण सुटले. त्यामुळे वाहन रस्त्याच्या बाजूला असलेल्या माहितीफलकाला धडकून उलटले. अपघाताची तीव्रता इतकी होती, की वाहनातील काही मजूर रस्त्यावर फेकले गेले, तर काही जण वाहनाखाली अडकल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. मात्र, अपघाताचे नेमके कारण अधिकृत तपासानंतरच स्पष्ट होणार आहे.
जखमींवर उपचार
अपघातातील जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. चारवर्षीय बालकाला पुढील उपचारासाठी कळवण उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, हात-पायांना गंभीर दुखापत झालेल्या चार जखमींना पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आल्याची माहिती आहे. इतर जखमींवरही उपचार सुरू आहेत.
दरम्यान, अपघातानंतर संबंधित वाहनचालक घटनास्थळावरून फरारी झाला. अभोणा पोलिसांनी अपघातग्रस्त वाहन ताब्यात घेतले असून, या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे.
नियमांची अंमलबजावणी कधी?
गुजरातहून रोज मोठ्या संख्येने मजूर पिक-अप व इतर खासगी वाहनांतून कळवण, कनाशी आणि अभोणा परिसरात कांदाचाळी, कांदा शेड तसेच शेतीच्या कामांसाठी येत असतात. मात्र, अनेक वाहनांत क्षमतेपेक्षा अधिक मजूर बसवून त्यांची वाहतूक केली जात असल्याची स्थानिकांची तक्रार आहे. या प्रवासात महिला आणि लहान मुलांचाही समावेश असतो. मालवाहू वाहनांत अशा प्रकारे मोठ्या संख्येने प्रवासी नेल्यास अपघाताच्या वेळी जीवितहानीचा धोका वाढतो.
अभोणा पोलिस ठाण्याकडून अशा वाहनचालकांना वेळोवेळी नोटिसा देणे आणि दंडात्मक कारवाई करणे सुरू असल्याचे सांगितले जाते. तरीही क्षमतेपेक्षा अधिक मजूर वाहून नेण्याचे प्रकार सुरू असल्याच्या तक्रारी आहेत. रोकडोबा फाट्यावरील अपघाताने या वाहतुकीच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न निर्माण केले आहेत.
KLW26B09753, KLW26B09754
कळवण : रोकडोबा फाट्यावर झालेल्या अपघातातील जखमींवर सुरू असलेले उपचार.