फोटो : H35159
नांदूरमध्यमेश्वरला ‘विलोभनीय बदकांचा राजपुत्र’
अभयारण्य बनले हजारो स्थलांतरित पक्ष्यांचे आश्रयस्थान
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. १६ : सध्या नांदूरमध्यमेश्वर पक्षी अभयारण्य स्थलांतरित पक्ष्यांच्या आगमनाने गजबजले आहे. हिवाळ्यात हजारो स्थलांतरित पक्ष्यांचे आश्रयस्थान ठरणाऱ्या या ठिकाणी जैवविविधतेचे जतन करण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. येथे रोजच नवनवीन पक्षी येत असून, पक्षी अभ्यासक व प्रेमी शेकडोंच्या संख्येने येथे येत आहेत.
सध्या येथे ‘टफ्टेड डक’ म्हणजेच विलोभनीय बदकांचा राजपुत्र म्हणवला जाणारा पक्षी आला असून, आता काही महिने तो येथे मुक्कामी राहणार आहे. दूर युरोपातील सायबेरिया अन् आइसलँडच्या गोठलेल्या प्रदेशातून हजारो मैलांचा खडतर प्रवास करत हा बदक नांदूरमध्यमेश्वरच्या पाणथळ क्षेत्रावर दर वर्षी हजेरी लावतो. हा ‘टफ्टेड डक’ काळ्या रंगाचा असतो. चकाकणाऱ्या गडद काळ्या पंखांची शान त्यावर लख्ख सोनेरी डोळ्याची ठेवण आणि डोक्यावर हवेत मुकुटासारखा डोलणारा मोहक तुरा या पक्ष्याचे सौंदर्य अधिकच वाढवतो. इतर साध्या बदकांसारखा हा फक्त पाण्यावर तरंगत नाही, तर पाण्याच्या तळाशी डुबक्या मारून शंख-शिंपले शोधण्यात पटाईत असतो. अंधूक प्रकाशातही लख्ख चमकणारे त्याचे सोनेरी-पिवळे डोळे आणि धोका जाणवताच पाण्याखाली अचानक अदृश्य होऊन दूर मान वर करण्याचा त्याचा खेळ थक्क करणारा आहे. याला प्रत्यक्ष बघितल्यावर निसर्गाचा हा जादूगार मनाला भुरळ घालतो.
विद्यार्थी, शिक्षक, पक्षी अभ्यासक, स्वयंसेवी संस्था आणि नागरिकांनी नांदूमध्यमेश्वरला भेट द्यावी, सहभागी व्हावे, असे आवाहन वन्यजीव विभागाने केले आहे.
कोट
‘टफ्टेड डक’ म्हणजेच एक विलोभनीय बदकांचा राजपुत्रच. इतर साध्या बदकांसारखा हा फक्त पाण्यावर तरंगत नाही, तर पाण्याच्या तळाशी डुबक्या मारून शंख-शिंपले शोधण्यात पटाईत असतो. नांदूरमध्यमेश्वर पाणथळावर असे अनेक पक्षी आले आहेत.
-हिरालाल चौधरी, वनपरिक्षेत्र अधिकारी, नांदूरमध्यमेश्वर वन्यजीव अभयारण्य