Tulsi Vivah 2022 : आजपासून तुलसीविवाहास प्रारंभ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Tulsi Vivah

Tulsi Vivah 2022 : आजपासून तुलसीविवाहास प्रारंभ

नाशिक : कार्तिक महिन्यातील शुक्‍ल पक्ष द्वादशी ते कार्तिक पोर्णिमेपर्यंत तुलसीविवाह तिथी असून शनिवार (ता. ४) पासून तुलसीविवाहास प्रारंभ होणार आहे. तुलसीविवाह हा गोरज मुहूर्तावर म्‍हणजे सायंकाळी केला जातो. तुलसीविवाह व्रताने कन्या दानाचे फळ मिळते. तसेच, सर्व राशींकरिता विवाह योगासाठी पूरक असे व्रत आहे. (Tulsi Vivah 2022 starts from today Nashik news)

तुळशी म्‍हणजे आरोग्‍यसंपन्न वनस्‍पती आहे. तुळशीच्या प्रत्‍येक भागाचा आयुर्वेदात तसेच औषधांमध्ये उपयोग केला जातो. तसेच तिला संजीवनी म्‍हणूनही संबोधले जाते. कारण तुलसीपासून भरपूर प्रमाणात ऑक्‍सिजन मिळतो. तसेच एखाद्या व्यक्‍तीस ऑक्‍सिजनची कमतरता जाणवल्यास त्‍याने तुळशीचा रस पिल्‍यास त्‍याचा लाभ होतो.

तसेच घरापुढील तुळशी म्‍हणजे घरात संपन्नता व देवाचा वास आहे असे मानले जाते. तसेच तुळशीचे रोप हे सौभाग्‍य व संसाररूपी जीवनात भरभरून सौख्य व समाधान देणारे मानले जाते. म्‍हणून प्रत्‍येक घरासमोर तुळशीचे रोप हे आवर्जून लावले जाते.

तुलसीविवाह महत्त्व व हेतू

भगवान विष्‍णूस तुळशी अतिशय प्रिय मानली जाते. विवाह सोहळ्याप्रमाणे तुलसीविवाह सोहळा पार पाडला जातो. आप्तस्‍वकीय, नातेवाइकांच्या सोबतीने तसेच दिवाळीतील फराळ नैवेद्य दाखविला जातो. तसेच भगवान विष्‍णू वा शालीग्राम, तसेच विष्‍णू अवतार श्रीकृष्‍णाशी तुळशीचा विवाह लावला जातो. तुलसीविवाह हा सर्व राशीसाठी विवाहपूरक असल्‍याने तुलसीविवाह केल्‍याने लग्‍न जुळण्याचे योग प्रबळ होतात.

यंदा निर्बंधमुक्‍त वातावरणामुळे तुलसीविवाह वाढणार आहेत. कन्यादान केलेले नसल्‍यास तुलसीविवाह करून कन्यादानाचे पुण्य अवश्‍य प्राप्त करावे. या व्रताने सौभाग्‍यासाठी तसेच वैवाहिक जीवनात सुख व समाधान व संपन्नता लाभते.

हेही वाचा: Tulsi Vivah 2022 : सकारात्मक ऊर्जा, प्राणवायू देणाऱ्या तुळशीचा दरवळ

तुलसीविवाह योग

कार्तिक द्वादशीला मुख्यत्‍वे तुलसीविवाह केला जातो. तसेच, द्वादशीपासून ते कार्तिक पौर्णिमेपर्यंत तुलसीविवाह तिथी आहे. तुलसी विवाह हा संध्याकाळी म्हणजेच गोरज मुहूर्तावर केला जातो. पंचांगाप्रमाणे शनिवार ते सोमवार तुलसीविवाहास उत्तम तिथी तसेच पौर्णिमेला म्‍हणजे मंगळवारी (ता. ८) खग्रास चंद्रग्रहण असल्‍याने सायंकाळी ६.१९ नंतर ग्रहण मोक्ष झाल्यानंतर शुचिर्भूत (स्‍नान करून) होऊन तुलसीविवाह करता येईल.

लागणारे साहित्‍य

यात मुख्यत्‍वेकरून उसाला जास्‍त महत्त्व आहे. विवाहासाठी उसाचा मंडप अंगणात उभा केला जातो. तसेच बोर, आवळा, सीताफळ, पेरू, तसेच ऋतूतील उपलब्‍ध फळ, मुळी, पूजेचे सर्व साहित्‍य, वस्‍त्र, फुलांच्या माळा, सौभाग्‍याचे सर्व सामान, हळद आदी तुळशीला लाल वस्‍त्र परिधान करून वा साडी नेसून सौभाग्‍य दागिन्यांनी तुळशीला सजविले जाते व विवाह लावला जातो. फटाक्‍यांची आतषबाजी केली जाते. अशाप्रकारे तुळशीविवाहापासून लग्‍न तिथींना सुरवात होत असते.

हेही वाचा: SAKAL Exclusive : गडावर 2 स्वतंत्र मार्गांचा विचार; 4 रोप वे करण्याचे नियोजन

टॅग्स :NashikweddingTulsi