esakal | प्लाझ्माच्या वाढीव पैशांसाठी नकली पिस्तुलाने धमकावले; दोघे पोलिसांच्या ताब्यात

बोलून बातमी शोधा

प्लाझ्माच्या वाढीव पैशांसाठी नकली पिस्तुलाने धमकावले; दोघे पोलिसांच्या ताब्यात
प्लाझ्माच्या वाढीव पैशांसाठी नकली पिस्तुलाने धमकावले; दोघे पोलिसांच्या ताब्यात
sakal_logo
By
अजित देसाई

सिन्नर (जि. नाशिक) : सिन्नरमधील एका खासगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या अत्यवस्थ रुग्णासाठी प्लाझ्मा देण्याच्या बदल्यात अवास्तव पैशांची मागणी करणाऱ्या व त्यासाठी रुग्णाच्या नातेवाइकांसह रुग्णालय कर्मचाऱ्यांना धमकावणाऱ्या दोघांना सिन्नर पोलिसांनी रविवारी (ता. २५) मध्यरात्री पंचवटी व सिडको परिसरातील वेगवेगळ्या लॉजमधून ताब्यात घेतले. प्लाझ्मासाठी ठरलेल्या रकमेपेक्षा कमी रक्कम मिळाल्याने रात्री अकराच्या सुमारास या दोघांनी सिन्नरमधील संबंधित रुग्णालय गाठत पक्षी हुसकवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या छऱ्याच्या नकली पिस्तुलाचा धाक दाखवत रुग्णालय परिसरात एक बार उडवल्याचा धक्कादायक प्रकार घडला.

शिवडे येथील एका रुग्णाला तातडीने प्लाझ्माची गरज होती. रुग्णाच्या नातेवाइकांनी त्यासाठी शोध घेतल्यावर नाशिकमध्ये एका ठिकाणी प्लाझ्मा उपलब्ध झाला. मात्र, त्यासाठी १८ हजार रुपयांचा व्यवहार संबंधितांमध्ये ठरला होता. शनिवारी दुपारी ठरल्याप्रमाणे नाशिक येथून एक युवक प्लाझ्माची बॅग घेऊन संबंधित रुग्णालयात आला. तेथे डॉक्टरांनी नातेवाइकांना बॅगसाठी किती पैसे दिले, याबाबत विचारणा केली. सर्वसाधारणपणे आठ हजारांच्या आसपास प्लाझ्मासाठी रक्कम देणे योग्य ठरेल. मात्र, आपत्कालीन परिस्थितीत त्या उपलब्ध झाल्याने दोन-चार हजार रुपये जास्त देण्यास हरकत नाही, असा सल्ला डॉक्टरांनी दिला. त्यामुळे ठरलेल्या १८ हजार रुपयांऐवजी रुग्णांच्या नातेवाइकांनी त्या तरुणाकडे केवळ १२ हजार रुपये दिले. त्यानंतर रात्री अकराच्या सुमारास दुचाकीवरून आलेल्या दोन युवकांनी रुग्णालयात येऊन डॉक्टरांची विचारणा केली. डॉक्टर रुग्णालयात नसल्याने त्यांनी शिवीगाळ करत पिस्तुलातून एक बार उडवत काढता पाय घेतला.

या प्रकाराबाबत माहिती मिळताच पोलिस निरीक्षक मुटकुळे यांच्यासह पथकाने धाव घेतली. सीसीटीव्ही फुटेज बघितल्यावर त्या तरुणांनी एक पिस्तूल टेबलवर काढून ठेवल्याचे दिसून आले. त्यांच्या शोधासाठी लागलीच नाकाबंदी करण्यात आली. पोलिसांनी दुपारी प्लाझ्मा घेऊन आलेल्या तरुणांबद्दल माहिती मिळवत त्याचे नाशिक रोड येथील घर गाठले. मात्र, त्यांना घडल्या प्रकाराबद्दल कल्पना नव्हती. प्लाझ्मा सिन्नरला पोचविण्याचे व पेमेंट घेऊन येण्याचे एक हजार रुपये मला भेटले, असे त्याने सांगितले. त्याच्या माहितीवरून पोलिसांनी पंचवटी परिसरातील एका लॉजवर छापा टाकून तेथे झोपलेल्या विकी जवरे (वय २०, रा. समतानगर, नाशिक) व त्याचा दुसरा साथीदार शुभम धाडगे (वय २२, रा. टाकळीगाव) यास ताब्यात घेतले. त्यांच्याकडून नकली पिस्तूल पोलिसांनी हस्तगत केले.

पोलिसांनी नोंदविली केवळ तक्रार

रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना पिस्तुलाचा धाक दाखवून धमकाविल्याचा गंभीर प्रकार घडूनही पोलिसांकडून मात्र ते नकली पिस्तूल असल्याचे सांगत आर्म ॲक्टअंतर्गत गुन्हा दाखल होत नसल्याचे सांगितले. साधे तक्रार रजिस्टर भरून घेत असल्याची माहिती पोलिस ठाण्यातून देण्यात आली. उद्या हेच तरुण ही पिस्तूल घेऊन एखाद्या बँकेत गेले असते तरी पोलिसांनी याच पद्धतीने नोंद केली असती का, हा प्रश्‍न उपस्थित होत आहे.

चढ्या दराने विक्री

ताब्यात घेतलेल्या दोघांपैकी एकजण नाशिकच्या एका नामांकित ब्लड बँकेत काही दिवस कामाला होता. त्या मुळे तेथील कामकाजाची त्याला माहिती होती. पॉझिटिव्ह रुग्णांचा शोध घेऊन त्यांना प्लाझ्मा दान करण्याविषयी विनंती करायचा व ग्राहक शोधून चढ्या भावाने या प्लाझ्माची विक्री केली जायची. आर्थिक गरजेपोटी अशा पद्धतीने तीन ते चार गरजू रुग्णांना प्लाझ्मा विक्री केल्याचे या दोघांनी सांगितले.