
स्मार्ट रोडवर थाटलेत अनधिकृत रिक्षाथांबे
नाशिक : मोठा गाजावाजा झालेल्या नाशिक शहरातील स्मार्ट रोड अनधिकृत रिक्षा थांबे, बेशिस्त पार्किंगमुळे वाहतूक कोंडीच्या समस्येत कोंडला गेला आहे. या साऱ्याचा त्रास या परिसरातील शासकीय कार्यालयांमध्ये येणाऱ्यांना नागरिकांना सोसावा लागतो आहे.
शहर बसथांब्यावरच रिक्षा थांबत असल्याने बसला जागा मिळत नाही. सायकल ट्रॅकवर कारची पार्किंग तर, फुटपाथवर दुचाकी पार्किंग यामुळे हाच का स्मार्ट रोड, असा उपरोधिक सवाल उपस्थित केला जात आहे. दुसरीकडे वाहतूक पोलिसही याकडे सोईस्कररीत्या दुर्लक्ष करीत असल्याचे बेशिस्त वाहनचालक अन् वाहतूक कोंडीला कारणीभूत रिक्षाचालकांचे फावते आहे.
अशोक स्तंभ ते त्र्यंबक नाका हा रस्ता ‘स्मार्ट रोड’ करण्यात आला. या रोडवरील दुतर्फा सायकल ट्रॅक, प्रशस्त फुटपाथ, ठराविक ठिकाणी बससाठी थांबे उभारलेले. त्यामुळे या प्रशस्त स्मार्ट रोडमुळे या मार्गावरील वाहतूक कोंडीच्या समस्येपासून सुटका होईल, अशी अपेक्षा होती. परंतु, नाशिककरांच्या अपेक्षा फोल ठरल्या असून, उलट समस्येमध्ये आणखी भर पडली. स्मार्ट रोडवर अनधिकृत रिक्षा थांबे उभे राहिले आहेत.
मेहेर सिग्नलकडे जाताना सीबीएस प्रवेशद्वारापासून ते अशोक स्तंभापर्यंत ठराविक अंतरावर रिक्षा थांबलेल्या असतात. या स्मार्ट रोडवर कुठेही रिक्षाथांबे देण्यात आले नाहीत. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शहर बसथांबा असून, त्यानंतर सर्कल थिएटर येथे शहर बसथांबा आहे. मात्र, सीबीएसचे प्रवेशद्वार, जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील बसथांब्यासमोर मेहेर सिग्नल, सर्कल थिएटर या ठिकाणी रिक्षा थांबे नसतानाही अनधिकृतरीत्या रिक्षा थांबलेल्या असतात.
हेही वाचा: आपत्ती व्यवस्थापन पथकांना स्वतंत्र ड्रेस कोड : आयुक्त पवार
रिक्षाचालकांची मुजोरी
स्मार्ट रोडवर असलेल्या शहर बस थांब्याच्या जागेवरच रिक्षा थांबलेल्या असतात. बऱ्याचदा शहर बसला थांबायला जागा नसते. तर, चालक त्याची रिक्षा हलवत नाही. प्रवाशांना बसमध्ये चढण्यासाठीही त्रास होतो. अशा वेळी अनेकदा वादावादीचे प्रश्न घडतात. परंतु, रिक्षाचालक प्रवाशांसह शहर बसचालकांवरही मुजोरी करतात.
विद्यार्थ्यांना त्रास
शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या शाळा- महाविद्यालयांचे विद्यार्थ्यांना या स्मार्ट रोडवरील बस थांब्यावरूनच बस असतात. सकाळ-संध्याकाळ या ठिकाणी गर्दी होते. परंतु, वाहतूक कोंडी, बसला थांबण्यास जागा मिळत नसल्याने या विद्यार्थ्यांना मनस्तापाला सामोरे जावे लागते.
"मला रोज याच स्मार्ट रोडने प्रवास करावा लागतो. परंतु, सकाळी ९ ते १२ आणि सायंकाळी ४ ते ७ या दरम्यान होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे मनस्तापाला सामोरे जावे लागते. पोलिस कारवाई करीत नाहीत. रिक्षाचालक मुजोरी करतात, हे नित्याचेच झाले आहे."
- दिलीप जाधव, नागरिक
"मी रोज म्हसरूळवरून शहरात शाळेसाठी येते. मात्र, वाहतूक कोंडीमुळे अनेकदा बसमध्ये चढण्यासाठीही जागा मिळत नाही. सायकल ट्रॅकवर रिक्षा आणि कार पार्क केलेल्या असतात. खूप त्रास होतो या सगळ्यांचा."
- रीना नाईक, विद्यार्थिनी
हेही वाचा: Nashik : तिरुपती- शिर्डी- नाशिक धार्मिक कॉरिडॉर शक्य
Web Title: Unauthorized Rickshaw Stops On Smart Road In Nashik City Unruly Parking Has Caused Traffic Jam Nashik News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..