नाशिक : दुभाजक ठरतंय वाहनधारकांच्या मृत्यूला आमंत्रण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Divider

नाशिक : दुभाजक ठरतंय वाहनधारकांच्या मृत्यूला आमंत्रण

लखमापूर (जि. नाशिक) : नाशिक विमानतळ हे नाशिकरांसाठी एक अभिमानास्पद बाब आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३ वरील दहावा मैल ते विमानतळ रस्ता मात्र वाहनधारकांसाठी असुरक्षित असल्याचे दिसून येते. हा रस्ता पूर्ण करताना संबंधित विभागाने रहदारी व उपरस्ते लक्षात घेऊन रस्ता ओलांडण्यासाठी दुभाजक तयार करणे आवश्यक होते; परंतु संबंधित विभागाने आवश्यकतेपेक्षा जास्त दुभाजक (Divider) ठेवल्याने ते वाहनधारकांना मृत्यूला आमंत्रण देत आहे. फ्रेशट्रॉप कंपनीच्या गेटसमोरच रस्ता ओलांडण्यासाठी दुभाजक दिल्याने गेटमधून येणाऱ्या वाहनांना रस्त्याने येणाऱ्या वाहनांचा अंदाज न येता तेथे अपघात होऊन मोठा अनर्थ होण्याची शक्यता आहे. (unnecessary divider become dangerous to vehicle owners Nashik News)

लहान-मोठे अपघात नित्याचेच झाले असताना निष्पाप लोकांचा बळी गेल्यावर संबंधित विभागाला जाग येईल की काय, असा संप्तत सवाल विचारला जात आहे. दहावा मैल ते विमानतळ रस्ता पूर्ण होण्यासाठी खूप कालावधी लागली. शेतकऱ्‍यांच्या जमिनीचे अधिग्रहण लवकर न झाल्याने रस्ता तयार होण्यासाठी बराच कालावधी लागला. पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सुरू केलेल्या या विमानतळाला सत्तांतरानंतर पाच वर्ष रस्ता तयार होण्यासाठी वाट बघावी लागली. परंतु विमानतळ्याच्या रस्त्याच्या सुरक्षिततेनुसार या रस्त्याचे कामकाज पूर्ण झाले नाही, हेच सत्य. या रस्त्यावर औद्योगिक वसाहत आहे.

त्यातील बहुतेक कंपन्या वरिष्ठ पातळीवर संबंध असलेल्या कंपन्या आहेत. फ्रेशट्रॉप कंपनीच्या गेटसमोरच रस्ता ओलांडण्यासाठी दुभाजक ठेवले आहे. कंपनीत येणाऱ्‍या वाहनांसाठी हा दुभाजक सोयीस्कर ठरत असला तरी वाहनधारकांसाठी मात्र हा दुभाजक जीवघेणा ठरत आहे. कंपनीच्या दोन्ही बाजूला काही ठराविक अंतरावर विशिष्ट ठिकाणी रहदारीच्या दृष्टिकोनातून रस्ता ओलांडण्यासाठी दुभाजकांची निर्मिती केली असताना कंपनीच्या गेटसमोर रस्ता ओलांडण्यासाठी दुभाजक कशासाठी, हे न उलगडणारे कोडे आहे. संबंधित विभागाने अपघातग्रस्त व मृत्यूला आमंत्रण देणाऱ्या हा रस्ता दुभाजक तत्काळ बंद करून नियमाप्रमाणे या कंपनीला थोड्या अंतरावर दुभाजकांची व्यवस्था करून द्यावी, अशी मागणी होत आहे.

हेही वाचा: Crime : क्राईम ब्रांच असल्याचे बतावणी करून वृद्धास लूटले

दुभाजक वाहनधारकांच्या जिवावर
नियमाप्रमाणे उपरस्ते व रहदारीचा दृष्टिकोन समोर ठेवून रस्ता ओलांडण्यासाठी दुभाजक तयार केले जाते. दहावा मैल ते विमानतळ रस्त्यावरील कंपनीत दिवसभरात अवजड वाहने मोठ्या प्रमाणात येतात. त्या वाहनांना रस्ता ओलांडण्यासाठी सोयीस्कर व्हावा, यासाठी कंपनीच्या गेटसमोरच रस्ता दुभाजकाची व्यवस्था करण्यात आली आहे. ही कंपनी पूर्णत: रस्त्याच्या कडेला असल्याने गेटच्या बाहेर येणाऱ्या वाहनांना समोरील वाहन दिसत नाही. दहावा मैल ते विमानतळ रस्त्याकडे जात असताना कंपनीपासून १०० मीटरवर १७ नंबर फाटा आहे. तेथून कंपनीपर्यंत पूर्णत: रस्त्याला उतार आहे. त्यामुळे वाहने वेगाने येत असतात. कंपनीतून वाहन बाहेर आले तर वाहनचालकांची धांदल उडते. अशाप्रसंगी लहान-मोठे अपघात होणे नित्याचेच झाले आहे.

हेही वाचा: तयारी खरिपाची; पुन्हा पांढर सोनं, मका, सोयाबीनचाच बोलबाला!

"दहावा मैल ते विमानतळ रस्ता हा धोकादायक ठरत आहे. रस्ता चांगला असल्याने वाहनांचा वेग जास्त असतो व अचानक एखाद्या ठिकाणी आडवे वाहन आल्यास वाहनधारकांची तारांबळ उडते. त्यातून लहान-मोठे अपघात होणे कायमचेच झाले आहे. रस्त्याच्या नियमानुसार दुभाजक होणे आवश्यक असताना अनावश्यक दुभाजक वाहनधारकांना मृत्यूला आमंत्रण देत आहेत."
- हर्षल काठे, सामाजिक कार्यकर्ते, जानोरी

Web Title: Unnecessary Divider Become Dangerous To Vehicle Owners Nashik News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..