ऊर्दू शिक्षक मृत्यूप्रकरणी शिक्षण मंडळाकडून चौकशी सुरू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Urdu teacher death case enquiry from Board of Education Malegaon

ऊर्दू शिक्षक मृत्यूप्रकरणी शिक्षण मंडळाकडून चौकशी सुरू

मालेगाव : शहरातील उर्दू प्राथमिक शाळा तपासणी दरम्यान झालेल्या शिक्षकाच्या मृत्यू प्रकरणाची शिक्षण विभागाने गंभीर दखल घेतली. शिक्षण उपसंचालकांनी या घटनेची चौकशी करुन अहवाल सादर करण्याचे निर्देश दिल्यानंतर महापालिका शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी एफ. डब्ल्यु. चव्हाण यांनी शाळेला भेट देत चौकशी सुरु केली आहे.

शहरातील अब्बासनगर उर्दू शाळा क्रमांक ५ मधील शिक्षक हमीद महेवी यांचा रविवारी आकस्मिक मृत्यू झाला होता. महापालिका प्रशासनाने कॉंग्रेस नगरसेवकांच्या तक्रारीवरुन शाळा तपासणी सुरु केली. काही शाळेत शिक्षक नव्हते. अनेक शाळेत भाडोत्री शिक्षक आहेत. या तपासणी दरम्यानच श्री. महेवी यांचा मृत्यू झाल्याने त्या घटनेचे राजकीय पडसाद उमटले. यानंतर शिक्षण उपसंचालकांनी चौकशीचे आदेश दिले. श्री. चव्हाण यांनी शाळेला भेट देत शिक्षकांशी चर्चा करुन घटनाक्रम जाणून घेतला. यातच शाळांना भेट देऊन पहाणी करण्याचा नगरसेवकांना अधिकार आहे किंवा काय याची माहिती आयुक्तांनी घ्यावी, अशी मागणी नगरसेवक मुश्‍तकीम डिग्निटी यांनी केली आहे.

दरम्यान आमदार मौलाना मुफ्ती मोहंमद इस्माईल यांनीही बुधवारी अधिवेशनात हा प्रश्‍न उपस्थित केला. मौलाना मुफ्ती यांनी शिक्षकाच्या मृत्यु प्रकरणाची सखोल चौकशी करावी. शाळेतच मृत्यू झाल्याने या घटनेची गंभीर दखल घेऊन दोषींवर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली. महापालिकेतील सत्तारुढ नगरसेवक शिक्षकांना हेतुपुरस्कर लक्ष्य करीत आहेत. त्यातूनच शाळा तपासणी सुरु झाल्याचे त्यांनी सांगितले. मयत शिक्षक हमीद महेवी यांच्या कुटुंबियांची मात्र कुठलीही तक्रार नाही. तथापि, या मृत्यु प्रकरणाचे राजकीय पडसाद उमटत आहेत.