esakal | कोरोनाच्या संकटात शेतीमाल मातीमोल; सिमला दीड रुपये तर कोबी १ रुपयास कंद

बोलून बातमी शोधा

amravati municipality to allow farmers to deliever vegitables door to door
कोरोनाच्या संकटात शेतीमाल मातीमोल; सिमला दीड रुपये तर कोबी १ रुपयास कंद
sakal_logo
By
राम खुर्दळ

गिरणारे/गंगापूर (जि. नाशिक) : कोरोनाच्या महामारीच्या संकटात शेतीमालाला मातीमोल भाव मिळत आहे. ओझरमार्केट मधे अक्षरशः वाहतूक खर्चाचे पैसे ही शेतीमाल विक्रीतून येत नाही, अशी गत होऊन बसली आहे. शेतीमाल विकुनही मातीमोल झाल्याने डोळ्यासमोर हॉस्पिटलचे बिल भरण्यासाठी ही पैसे नसल्याने शेतकरी ढसाढसा रडत होता. तातडीने सरकारने याची दखल घ्यावी किंवा आमच्या जमिनी कसून दाखवाव्या, अशी उद्विग्न प्रतिक्रिया मोहाडी (ता. दिंडोरी) येथील युवा शेतकरी सोनू काठे याने व्यक्त केली.

२८ एप्रिलला ओझर मार्केटमध्ये टॉमोटो ५ रुपये, गाजर ३ रूपये, सिमला दीड रुपये, तर कोबी, फ्लॉवर रुपया दोन रुपये कंद, हिरवी मिरची ८ ते १० रुपये किलोने विक्री झाला. बाजारभाव मिळत असल्याने शेतकरी कमालीचे चिंतेत आहोत. घरातील ३ व्यक्ती कोरोनात ऍडमिट असताना त्या घरातील शेतकऱ्याला त्याच्या सिमलाचे अवघे प्रति कॅरेट ३० ते ४० रुपये भाव भेटल्याने हातात आलेल्या ८०० रुपयात त्याचा वाहतूक खर्च भागणार नसल्याने अक्षरशः सोनू काठे हा शेतकरी रडत होता. सध्या कोरोनाने सर्वत्र हाहाकार माजवला आहे. अनेकांचे रोजगार गेले, व्यवसाय बंद आहेत. त्यात सामान्य माणूस आर्थिक कोंडीत आहे. खुल्या बाजारात चढ्या भावाने भाजीपाला दलाल, व्यापारी विकतात. मग आम्हाला का मातीमोल भाव, असा सवाल शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे. पिकासाठी कित्येक खर्च व कष्ट करावी लागतात, मात्र हातात काहीच येत नाही. घर कसे चालवायचे, असा सवालच नागलवाडी (ता. नाशिक) येथील धोंडीराम बेंडकोळी यांनी व्यक्त केला आहे.

हेही वाचा: महामारी आजारांचा चारशे वर्षांचा इतिहास! सोशल मीडियावर संदर्भासह चित्र व वृत्त

एकीकडे शेतीमाल थेट खुल्या बाजारात चढ्या भावाने विकला जात आहे, अन्‌ दुसरीकडे ओझर व अन्य मार्केटमध्ये शेतकऱ्यांना शेतीमालाच्या भावाच्या पट्ट्या बघून संताप येत आहे. १ रुपयाला कोबीचा, फ्लॉवरचा कंद व दीड रुपया किलो सिमला मिरची विकली गेली. अक्षरशःमार्केटला शेतीमाल आणण्याचा खर्च सुद्धा यातून मिळत नसल्याने ही कष्टकरी शेतकऱ्यांची थट्टाच आहे. आता सरकारनेच आमच्या जमिनी कसून दाखवाव्यात.

- सोनू भिडे, शेतकरी, मोहाडी (ता. दिंडोरी)

हेही वाचा: गॅंगस्टर रवी पुजारी नाशिक न्यायालयात हजर; मोठा पोलीस बंदोबस्त