
Nashik : सर्वच भाज्या महागल्याने गृहिणींची पसंती कडधान्याला
नाशिक : गत आठवड्यापर्यंत धो- धो बरसलेल्या पावसामुळे बाजार समितीत सर्वच प्रकारच्या भाज्यांच्या आवकेत मोठी घट झाली आहे. त्यामुळे पालेभाज्यांसह सर्वच प्रकारच्या भाज्यांच्या दराने तेजी गाठल्याने महागड्या भाज्यांपेक्षा गृहिणींची पसंती आता कडधान्याला राहिली आहे. (vegetables are expensive housewives prefer pulses to buy nashik Latest marathi news)
जिल्हाभरात महिनाभर थैमान घातलेल्या मुसळधार पावसाने मेथी, कोथिंबीर, शेपू, पालक या पालेभाज्या शेतातच सडून गेल्या. तर अन्य भाजीपाल्यांवरही त्याचा परिणाम झाल्याने आवक पंधरा वीस टक्क्यांपर्यंत घसरली.
त्यामुळे स्थानिक बाजारातही भाज्या मिळणे दुरापास्त झाले. कालच्या (ता.३) आठवडे बाजारात सर्वच प्रकारच्या किलोभर भाज्यांसाठी ऐंशी ते शंभर रुपये मोजावे लागत होते.एरवी पंधरा ते वीस रुपये किलोप्रमाणे उपलब्ध होणारे बटाटेही ३० रुपयांपर्यंत जाऊन पोहोचले.
याशिवाय मेथीच्या जुडीसाठी तीस ते चाळीस रुपये मोजावे लागते होते, तर कोथिंबीर गायबच झाली आहे. सर्वच प्रकारच्या भाज्यांच्या दराने तेजी गाठल्याने गृहिणींचे बजेट कोसळले. भाज्यांचे दर वाढल्याने अनेक गृहिणींनी चवळी, मठ, मूग, मटकी, हरभरा, मसूर अशा कडधान्याला पसंती दिली.
विशेष म्हणजे अवघ्या दहा ते पंधरा रूपयांत एकवेळच्या भाजीचा प्रश्न सुटत असल्याने अनेक गृहिणींनी कडधान्यांना पसंती दिली आहे.
"आठवडे बाजारात भाजीपाला स्वस्तात उपलब्ध होतो, परंतु सर्वच प्रकारच्या भाज्यांच्या दराने तेजी गाठल्याने गृहिणींनी कडधान्याला पसंती दिली आहे." - अर्चना पगार, गृहिणी, पंचवटी