सलग दोन्ही गुन्ह्यातील जामीन फेटाळले

सलग दोन्ही गुन्ह्यातील जामीन फेटाळले
Published on: 
मविप्र बनावट लेटरहेड, शिक्के प्रकरण ----- विजय पाटलांचा कारागृहाती मुक्काम पुन्हा वाढला न्यायालयाने सलग दोन्ही गुन्ह्यातील जामीन फेटाळले सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. ७ : जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज या संस्थेच्या नावे बनावट लेटरहेड तयार करणे, शिक्क्यांचा गैरवापर आणि जिल्‍हा बँकेतील संस्थेच्या खात्याशी संबंधित फसवणूक प्रकरणात विजय भास्कर पाटील यांचा जामीन अर्ज जिल्‍हा न्यायालयाने फेटाळला आहे. सलग दोन्ही गुन्ह्यातील जामीन फेटाळून लावल्याने पाटील यांचा कारागृहातील मुक्काम वाढला आहे. संशयित विजय पाटील यांना सलग दोन दिवसांत न्यायालयाचे दोन मोठे धक्के बसले आहेत. जळगाव जिल्‍हा मराठा विद्या प्रसारक समाज या संस्थेवरील ताबा प्रकरणात विजय भास्कर पाटील यांच्या विरुद्ध जिल्‍हा पेठ पोलिस ठाण्यात दोन गुन्हे दाखल आहेत. या गुन्ह्यांमध्ये विजय भास्कर पाटील यांना २७ जुलैला अटक करण्यात आली असून तेव्हा पासून ते कारागृहात आहेत. न्यायालयात ६ व ७ नोहेंबर असा सलग दोन्ही अर्ज न्यायालयाने निकाली काढले. शुक्रवारी (ता.६) जळगाव मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळताना संशयिताने संस्थेचे बनावट लेटरहेड तयार करणे, त्याचा वापर केल्याबाबत प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध असल्याचे स्पष्ट केले. संशयीतविरुद्ध जवळपास १२ गुन्हे प्रलंबित असल्याची नोंद घेत न्यायालयाने त्याच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीचा, पूर्वीच्या जामीन अटी असतानाही समान स्वरूपाच्या कथित कृत्यांची पुनरावृत्ती झाल्याचा आणि साक्षीदारांवर प्रभाव टाकण्याच्या शक्यतेचा गंभीरपणे विचार केला. सहसंशयित पराग रवींद्र कदम फरार असल्याचीही न्यायालयाने दखल घेतली. ---------- दुसरा अर्जही फेटाळला.. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील खाते प्रकरणाशी संबंधित गुन्ह्यात प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयाने विजय पाटील यांचा दुसराही जामीन अर्ज फेटाळला. या प्रकरणात संस्थेचे अध्यक्ष असल्याचे भासवून कथित बनावट ठराव, शिक्के व कागदपत्रांच्या आधारे बँक खाते हाताळल्याचे आरोप आहेत. संबंधित खात्यातून १८ लाख ७१ हजार ४३४ रुपये वजा झाल्याची नोंद असून या रकमेच्या वापराबाबतचा तपास अद्याप अपूर्ण असल्याचे न्यायालयाने नमूद केले आहे. न्यायालयाने दिलेल्या दुसऱ्या निकालात संशयीत विरुद्ध सुमारे १५ गुन्हे नोंद असल्याचा उल्लेख करत न्यायालयाने त्याच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीची गंभीर दखल घेतली. ------- कारागृहातच मुक्काम एकापाठोपाठ दोन स्वतंत्र गुन्ह्यांमध्ये जामीन अर्ज नामंजूर झाल्यामुळे संशयित विजय भास्कर पाटील यांच्या अडचणी अधिकच वाढल्या आहेत. दोन्ही न्यायालयांनी नोंदविलेल्या निरीक्षणांमुळे सध्यातरी पाटील यांच्या सुटकेची वाट कठीण आहे.