Latest marathi News | वाके येथे गावठी दारु, रसायन जप्त; 2 महिला ताब्यात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

crime news

Nashik Crime News : वाके येथे गावठी दारु, रसायन जप्त; 2 महिला ताब्यात

मालेगाव (जि. नाशिक) : वाके (ता. मालेगाव) येथे अवैध गावठी दारुची निर्मिती तसेच, गावठी व देशी दारुची सर्रास विक्री सुरु असल्याच्या ग्रामस्थांच्या तक्रारीची दखल घेत राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक सचिन श्रीवास्तव यांच्या आदेशाने दुय्यम निरीक्षक व सहकाऱ्यांनी छापे टाकून गावठी हातभट्टीचा एक अड्डा उद्‌ध्वस्त केला.

गावठी दारु विक्री करणाऱ्या दोघा महिलांना ताब्यात घेऊन त्यांच्याजवळून सुमारे २१०० रुपये किंमतीची ३७ लिटर गावठी जप्त करण्यात आली. श्री. श्रीवास्तव यांनी या कारवाईचे पत्र तक्रार करणाऱ्या ग्राहक जनशक्तीचे तालुकाध्यक्षांना पाठविले आहे. पत्रात वाके येथे छापा टाकला असता गावठी दारु विक्री व निर्मिती केंद्र मिळून आल्याचे म्हटले आहे.

हेही वाचा: Rain Update : चांदवड तालुक्यात वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस

या पथकाने नबाबाई माळी यांना ताब्यात घेत त्यांच्याजवळून ९९० रुपये किंमतीची १७ लिटर गावठी दारु तर सरलाबाई माळी यांना ताब्यात घेऊन एक हजार १३० रुपये किंमतीची २० लिटर गावठी दारु जप्त केली. या पथकाने वाके शिवारातील बेवारस गावठी हातभट्टीचा अड्डा उद्‌ध्वस्त केला.

येथून १३ हजार ६५० रुपये किंमतीचे गावठी दारु निर्मितीसाठी लागणारे ६६० लिटर रसायन जप्त केले. सकाळने वाके येथे सर्रास येथे गावठी दारु विक्री व निर्मिती होत असल्याचे वृत्त प्रसिद्ध केले आहे. राज्य उत्पादन शुल्क व पोलिसांनी सलगपणे कारवाया केल्यास अवैध गावठी दारु निर्मितीला चाप बसेल, असे ग्रामस्थांनी सांगितले.

येथून परिसरातील पाच ते सात गावात अवैध गावठी दारु विक्री होते. दारुमुळे अनेक कुटुंबही उद्‌ध्वस्त झाली आहेत. ग्रामस्थांनी याबाबत राज्य उत्पादन शुल्क विभागालाही निवेदन सादर केले होते.

हेही वाचा: Shardiya Navratri 2022 : गरबा दांडियाचा उत्साह; पाहा PHOTOS