‘इंग्रजीला ‘वाघिणीचं दूध’ म्हणणारे मराठी गद्याचे जनक विष्णुशास्त्री चिपळूणकर

Vishnu Shastri Chiplunkar
Vishnu Shastri Chiplunkaresakal

२० मे १८५० ते १७ मार्च १८८२ हा विष्णुशास्त्री चिपळूणकर यांचा कार्यकाळ; आणि त्यांचं कार्यक्षेत्र पुणे. अर्थात पुऱ्या महाराष्ट्रभर त्यांच्या कार्याचे पडसाद उमटले. खरंतर भारतभर उमटले. मात्र, विष्णुशास्त्रींचं वास्तव्य राहिलं ते कायम पुण्यातच.

अवघ्या बत्तीस वर्षांचं अल्पायुष्य त्यांना लाभलं. चिपळूणकरांचं कुटुंब मुळात रत्नागिरीतलं. पुढे ते कुटुंब नाशिक इथल्या त्र्यंबकेश्वर इथे स्थायिक झालं आणि नंतर पुण्यात. विष्णुशास्त्री यांच्या आधी त्यांच्या वडिलांविषयी म्हणजे कृष्णशास्त्री यांच्याविषयी थोडी माहिती घेणं उद्‍बोधक ठरतं. ते विद्वान पंडित होते. (Vishnushastri Chiplunkar father of Marathi prose Nashik Latest Marathi News)

त्यांच्या कुशल आणि चाणाक्ष बुद्धीचं वर्णन करताना संस्कृत विद्वान मोरशास्त्री साठे म्हणतात, ‘कृष्णशास्त्री चिपळूणकर म्हणजे पुणे पाठशाळेतील संस्कृतीचे बृहस्पती आहेत.’ कृष्णशास्त्री हे महात्मा फुल्यांनी पुण्यात स्थापन केलेल्या भारतातल्या मुलींच्या पहिल्या शाळेचे व्यवस्थापकीय सभासद होते.

असा वैचारिक वारसा विष्णुशास्त्रींना लाभला होता. पराक्रम हा केवळ रणांगणातच गाजवता येतो असं नाही, तो अनेक प्रकारे सिद्ध करता येतो. शत्रूशी दोन हात करण्याचं सामर्थ्य हे लेखणीतही असतं हे विष्णुशास्त्री चिपळूणकरांनी सिद्ध केलं.

साहित्य, पत्रकारिता, शिक्षण, राजकारण आदी क्षेत्रांत त्यांचा निर्भीड वावर होता, हुकमत होती. कुशाग्र बुद्धिमत्ता त्यांना लाभली होती. ते त्यांच्या भावंडांची शिकवणी घरी घेत असत. विष्णुशास्त्री यांना त्यांच्या वयाच्या सातव्या वर्षापासून त्यांचे आजोबा उजळणी, लेखन, वाचन शिकवत असत.

पेशवाईतल्या व्यक्तींच्या पराक्रमाच्या धाडसी आणि साहसी कथा; तसंच, मराठ्यांच्या इतिहासाची माहिती मनोरंजक पद्धतीने सांगत. त्यामुळे, देशप्रेम, स्वधर्म आणि संस्कृती यांचे सर्वांगीण संस्कार त्यांच्यावर झाले. विष्णुशास्त्री यांचं शालेय शिक्षण ‘इन्फन्ट स्कूल’ आणि ‘पूना हायस्कूल’ या शाळांमध्ये झालं. ते नागनाथ अण्णांच्या वाड्यात भरणाऱ्या शाळेत मोडी, अक्षरलेखन, वाचन तसंच तोंडी हिशेब शिकले होते.

त्यांना ‘पूना हायस्कूल’मध्ये चिमणाजी महादेव, नारायण कृष्ण गोखले आणि वामन आबाजी मोडक यांच्यासारखे चांगले शिक्षक लाभले. ते ‘पूना हायस्कूल’मध्ये कृष्णशास्त्री वैजापूरकर या शास्त्रींकडून संस्कृत विषय उत्तम प्रकारे शिकले. विष्णुशास्त्री यांनी शाळेत असताना ऑलिव्हर गोल्डस्मिथचं ‘द डेझर्टेड व्हिलेज’ हे दीर्घकाव्य बिनचूक पाठ करून चिमणाजी महादेव या शिक्षकांकडून हातरुमाल बक्षीस म्हणून मिळवला होता. त्यांचा विवाह वयाच्या सोळाव्या वर्षी नारायण भिकाजी गोगटे यांच्या कन्येशी म्हणजे काशीबाई यांच्याशी झाला.

‘पूना कॉलेज’ आणि ‘डेक्कन कॉलेज’मधून विष्णुशास्त्रींनी १९७१ मध्ये महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केलं. त्यांना अनेक व्यासंगी अध्यापकांचा सहवास लाभला. त्यांना वाचनाचं व्यसन जडलेलं होतं. पुण्यात रविवारी भरणाऱ्या बाजारातून जुनी पुस्तकं विकत घेऊन वाचनाची भूक ते भागवत. वैयक्तिक आणि सामाजिक आयुष्यात आलेल्या कठीण प्रसंगांवर मात करत त्यांनी सामाजिक कार्याची धुरा समर्थपणे सांभाळली होती.

प्रसिद्ध इंग्रजी कवी विल्यम वर्डसवर्थ यांचे नातू त्यांना डेक्कन कॉलेजमध्ये प्रोफेसर म्हणून शिकवायला होते. वर्डसवर्थ यांच्या शिकवण्याचा त्यांच्यावर खूप मोठा प्रभाव होता. त्यांच्यामुळेच त्यांनी ग्रीक, रोमन आणि इंग्रजी इतिहासकारांचे ग्रंथ वाचून काढले होते. त्यांनी इतिहास, अर्थशास्त्र, तर्कशास्त्र आणि नीतिशास्त्र तसंच इंग्रजी, संस्कृत आणि मराठी या विषयांचा अत्यंत सूक्ष्म आणि सखोल अभ्यास केला होता.

बी.ए. होण्यापूर्वीच ते वडिलांच्या ‘शालापत्रक’ या मासिकाचं काम पाहत असत. मात्र त्यातून ब्रिटिश सरकारचं धोरण आणि मिशनरी यांच्यावर केलेल्या टीकेमुळे ते मासिक ब्रिटिशांनी १८७५ मध्ये बंद पाडलं.

पण त्यापूर्वीच २५ जानेवारी १८७४ ला विष्णुशास्त्रींनी ‘निबंधमाला’ हे मासिक सुरू केलं होतं. ते त्यांनी एकहाती सात वर्षं; म्हणजे त्यांच्या मृत्यूपर्यंत चालवलं. १८१८ ते १८७४ हे प्राधान्याने भाषायुग आहे असं म्हणता येतं. या काळाला ‘शालेय

वाङ्‌मयाचा काळ’ असंही म्हणतात. या काळातला निबंध वाङ्‌मयाचा विचार केला तर प्रबोधनाच्या ऊर्मीतून झालेली प्राथमिक

Vishnu Shastri Chiplunkar
क्रूरतेने मारलेल्या 'त्या' चिमुरडीचा अखेर उपचारादरम्यान मृत्यू ; गुन्हा दाखल

स्वरूपाची निबंधरचना असं या निबंधांचं स्वरूप होतं. साहजिकच, तत्कालीन काळातील राष्ट्रवादाच्या विचारभावनेला उद्‍गार देण्याचं प्रमुख कार्य या निबंधांनी केलं असं म्हणता येतं.

‘निबंधमाला’ पूर्वकाळात भारतीयांमधला लोप पावलेला स्वाभिमान जागृत करण्याचं कार्य ‘निबंधमाले’ने केलं. हे करताना विष्णुशास्त्री चिपळूणकर यांनी परंपरा रक्षणाबरोबरच पाश्चात्त्य विद्येच्या ग्रहणावर भर दिला. महाविद्यालयीन शिक्षण संपल्यावर विष्णुशास्त्रींनी शिक्षकी पेशा निवडला. १८७२ ते १८७७ ते पुण्यात, तर १८७८-७९ मध्ये रत्नागिरीत शिक्षक म्हणून काम करत होते. जोडीला ‘निबंधमाले’तलं लेखन सुरूच होतं.

त्यात तत्कालीन ब्रिटिश सत्तेच्या अन्यायकारक धोरणांबाबत कडाडून टीका असे. १८७८ मध्ये महाराष्ट्राच्या इतिहासाची लोकांना अधिक माहिती आणि जाणीव व्हावी या हेतूने त्यांनी लेखन केलं. सामान्यजनांची अभिरुची घडावी म्हणून ‘काव्येतिहाससंग्रह’ हे मासिक सुरू केलं. ‘फर्ग्युसन कॉलेज’च्या स्थापनेत त्यांचा पुढाकार होता. पुढे इतक्या नावारूपाला आलेल्या ‘डेक्कन एज्युकेशन सोसायटी’ची पाळंमुळं अशी रोवली गेली होती.

इतकंच नाही तर त्यांनी ‘किताबखाना’ नावाचं दुकान उघडलं होतं. इंग्रजी भाषेचं महत्त्व ते जाणत असले तरी मराठी भाषेच्या उत्कर्षासाठी त्यांची धडपड कधी थांबली नाही. मुद्रण तंत्र भारतात आल्यावर त्याचा पुरेपूर उपयोग विष्णुशास्त्रींनी करून घेतला; त्यांनी ‘आर्यभूषण’ या छापखान्याचीही स्थापना केली. त्यामुळेच मुद्रण व्यवसायालाही चालना मिळाली. त्यांनी एकूण ८४ अंक प्रसिद्ध केले.

तो काळ बघता या सर्व घडामोडी फारच लक्षणीय ठरतात. ‘चाललंय ते ठीक चाललंय की! ब्रिटिशांची सत्ता असली तर काय झालं; आपल्याला उत्तम नोकरीधंदा मिळतोय ना!’ असा कूपमंडूक विचार करणारा सामान्य तरुणही या काळात मोठ्या संख्येने होता. या तरुणांच्यात राष्ट्रीय अस्मिता जागृत करण्याचं मोठं काम करणं गरजेचं होतं.

ब्रिटिशांच्या वर्चस्वाखाली देश भरडला जात असताना अवतीभवती प्रतिकूल वातावरण असतानाच्या या साऱ्या घडामोडी आहेत. सगळ्या परिस्थितीला विष्णुशास्त्री पुरून उरले. व्यासंग, वैचारिक बळ आणि स्वातंत्र्याकडे वाटचाल करण्याची दुर्दम्य इच्छा तसंच महत्त्वाकांक्षा असल्याशिवाय हे शक्य नव्हतं.

विद्यार्थ्यांना राष्ट्रीय शिक्षण देण्याच्या उद्देशातून १८८० मध्ये त्यांनी बाळ गंगाधर टिळक आणि गोपाळ गणेश आगरकर यांच्या सहकार्याने पुण्यात ‘न्यू इंग्लिश स्कूल’ची स्थापना केली.

अतिशय महत्त्वाची बाब म्हणजे, ते ‘इंग्रजी’ भाषेचं महत्त्व फार चांगल्या रीतीने जाणत होते. ब्रिटिशांच्या वर्चस्वाला त्यांनी नाकारलं पण त्यांच्या भाषेला स्वीकारलं. खरंतर ब्रिटिशांनी स्वार्थापोटी कारकून तयार करण्यासाठी भारतीयांना शिक्षण देऊन तयार करायला सुरवात केली होती. पण ते शिक्षण मिळाल्यानेच त्यांचा वार त्यांच्यावरच उलटविण्याच्या विचाराने प्रेरित होऊन भारतीय तरुण रक्त त्यांच्या विरोधात उभं राहत होतं.

त्यातलं अतिशय महत्त्वपूर्ण नाव विष्णुशास्त्री चिपळूणकर. शिक्षण आणि लेखणी या दोन तोफा यासाठी त्यांच्या हाती होत्या. ब्रिटिशांना हद्दपार करून स्वातंत्र्याकडे वाटचाल हे ध्येय समोर असताना इंग्रजी भाषेसंदर्भात मात्र त्यांची एक ठाम भूमिका होती; आणि ती बिलकूल विरोधात जाणारी नव्हती. संस्कृतइतकंच ते इंग्रजीचं महत्त्व जाणत होते. ते इंग्रजीला ‘वाघिणीचं दूध’ म्हणत असत. इंग्रजी भाषेच्या अध्ययनाने आपल्याला जगाचं ज्ञान मिळवून देणारी खिडकी उपलब्ध होते, असं त्यांचं मत होतं.

त्यांना टिळक-आगरकरांचं समर्थ सहकार्य लाभलं होतं. या त्रयीने त्या काळात पुण्याच्या पर्यायाने भारताच्या वैचारिक क्षेत्रांत खळबळ उडवून दिली होती. शालेय तसेच महाविद्यालयीन विद्यार्थी हे या तिन्ही शिक्षकांचं आशास्थान होतं. आपल्या वैचारिकतेची परंपरा पुढे नेण्यासाठी विद्यार्थ्यांची वैचारिक बैठक तत्कालीन गरजेनुसार राष्ट्रीयत्वाच्या भावनेने दृढ व्हावी हा त्यांचा आग्रह होता.

राष्ट्रीय बाण्याचे तरुण त्यांना घडवायचे होते. विद्यार्थ्यांना आणि सामान्यजनांना स्वातंत्र्याचं महत्त्व पटवून संघर्षासाठी तयार करण्याचं काम त्यांना करायचं होतं. त्यासाठी वर्तमानपत्रासारखं दुसरं उत्तर नाही. म्हणूनच विष्णुशास्त्रींनी १८८१ मध्ये ‘केसरी’ हे मराठी आणि ‘मराठा’ हे इंग्रजी वृत्तपत्र सुरू केलं. चिपळूणकरांच्या मृत्यूनंतर टिळकांनी ही दोन्ही वृत्तपत्रं पुढे चालवली.

विद्वत्व, कवित्व आणि वक्तृत्व हे तीन गुण चिपळूणकर, टिळक आणि आगरकर या त्रयीसाठी खूप उपयोगाचे ठरले. त्या तिघांनीही एकत्र येत तत्कालीन तरुणांचा दृष्टिकोन तयार करण्याचं जे काम केलं त्याला तोड नाही.

विष्णुशास्त्री चिपळूणकरांच्या लेखन विषयांवर उडती नजर टाकली तरी त्यातलं वैविध्य आणि वैचारिकतेचे विविध आयाम लक्षात येतात. इतिहासावरचं लेखन, संस्कृत कविपंचक, बाणभट्टाच्या ‘कादंबरी’ या संस्कृत ग्रंथाचा मराठी अनुवाद, निबंधमाला, पद्यरत्नाची, मराठी व्याकरण, वक्तृत्व, वाङ्‌मयविषयक लेखन, विष्णुपदी (तीन खंड) द हिस्ट्री ऑफ रासेन्स या पुस्तकाचा मराठी अनुवाद. (सहानुवादक ः कृष्णशास्त्री चिपळूणकर) विनोद आणि महदाख्यायिका, सॉक्रेटिसचं चरित्र...

इतकं वैचारिक आणि वैविध्यपूर्ण लेखन! या विद्वानाची ओळख आपल्या मुलांना-विद्यार्थ्यांना नीटपणे करून देणं हे शिक्षक-पालक म्हणून आपलं निश्चितपणे कर्तव्य आहे. नुसतं परीक्षेपुरतं केसरी-मराठा ही वृत्तपत्रं विष्णुशास्त्रींनी सुरू केली हे ठाऊक असून, पुरेसं नाही; तत्कालीन विद्यार्थी आणि राष्ट्रहिताचा विचार करणारे तरुण त्यातून घडले हा इतिहास त्यांना समजावून सांगायला हवा. इंग्रजी, संस्कृत, मराठी या भाषा त्यांना कशा सारख्याच महत्त्वाच्या वाटत आल्या हे आजच्या विद्यार्थ्यांना कळायलाच हवं. म्हणजे, अनेक भाषांच्या अभ्यासाचं महत्त्व त्यांना समजेल.

चिपळूणकरांनी अफाट साहित्यनिर्मिती केली. त्यांच्यावर अनेक पुस्तकं लिहिली गेली. मराठी भाषेतल्या त्यांच्या अतुलनीय कामगिरीबद्दल त्यांना ‘मराठी भाषेचे शिवाजी’ म्हणतात. ते ‘आधुनिक गद्याचे जनक’ म्हणून ओळखले जातात. या श्रेष्ठ ग्रंथकाराची ‘सामाजिक सुधारणेचा वाहता झरा’ अशीही ओळख आहे.

झरा पाहायला गेल्यावर परत येताना आपण काही रिकाम्या हाताने परत येत नाही. भरभरून मोकळी हवा, थंडावा आणि आल्हाद मनात साठवून परततो. तसंच, विष्णुशास्त्री यांच्या विचारधारेत परिपूर्ण होण्याचं शिक्षण घेणं आपल्याला विद्यार्थ्यांना शिकवता आणि पटवता यायला हवं! कारण त्यांचा राष्ट्रवाद ‘तात्पुरता’ नव्हता. केवळ स्वातंत्र्यापुरता मर्यादित नव्हता. तो प्रगतीपूरक होता.

Vishnu Shastri Chiplunkar
Nashik : सोनसाखळी चोरट्यासह सराफास अटक; 3 गुन्हे उघड

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com