esakal | त्र्यंबकेश्‍वर ज्योतिर्लिंग मंदिरात उद्यापासून दर्शन
sakal

बोलून बातमी शोधा

nahsik

त्र्यंबकेश्‍वर ज्योतिर्लिंग मंदिरात उद्यापासून दर्शन

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

त्र्यंबकेश्‍वर : येथील ज्योतिर्लिंग मंदिरात गुरुवार (ता. ७)पासून भाविकांना दर्शन घेता येणार आहे. ६५ वर्षांपुढील आणि दहा वर्षांतील बालकांना मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही. शिवाय गर्भवती महिला, रेड व कन्टेन्मेंट झोनसह होम कॉरन्टाइन भक्तांना दर्शन दिले जाणार नाही. लसींचे दोन डोस झाले नसल्यास ७२ तासांमधील आरटीपीसीआर निगेटिव्ह प्रमाणपत्र दर्शनासाठी सादर करावे लागेल.

मंदिरात दर्शन मार्गावर मास्क वापरणे बंधनकारक असेल. मोफत दर्शनासाठी पूर्व महाद्वारासमोरील दर्शन मंडपात भाविकांची सोय केली आहे. दर्शनबारीमध्ये इथून प्रवेश दिला जाईल. देणगी दर्शनासाठी उत्तर महाद्वारातून व्यवस्था राहील. दररोज पाच हजार भाविकांना दर्शन देण्यात येईल. पादत्राणे भाविकांना आपल्या वाहनांमध्ये ठेवावी लागणार आहेत. भाविकांना हार, फुले, श्रीफळ आणि प्रसादाचे साहित्य सोबत नेता येणार नाही. मंदिरात प्रवेश करताना मास्कसोबत स्क्रीनिंग केले जाईल.

सॅनिटायझरचा वापर करावा लागेल. सहा फुटांचे अंतर भाविकांना राखावे लागेल. चिन्हांकित जागेवर भाविकांना उभे केले जाईल. शिवाय देवस्थानच्या कर्मचाऱ्यांकडून मिळणाऱ्या सूचनांचे भाविकांना पालन करावे लागेल. अनावश्‍यक ठिकाणी हात लावता येणार नाही. त्र्यंबकेश्‍वरवासीयांना सकाळी आठ ते दहा आणि सायंकाळी साडेपाच ते साडेसात दर्शनाची वेळ असेल. स्थानिकांनी दर्शनासाठी येताना सोबत आधारकार्ड आणावे लागेल. स्थानिकांव्यतिरिक्त पाहुणे, नातेवाइकांना स्थानिकांच्या दरवाज्यातून सोडले जाणार नाही. परिस्थितीनुसार बदल करण्याचे अधिकार श्री त्र्यंबकेश्‍वर ट्रस्ट व्यवस्थापनाने सुरक्षित ठेवले आहेत.

बसण्याचा आग्रह अमान्य

भाविकांना मंदिराच्या सभामंडपात अथवा परिसरात बसता येणार नाही. नाक आणि तोंडावरील मास्क कोणत्याही कारणास्तव काढता येणार नाही. मास्क, हँडग्लोज, फेसशिल्ड अथवा अनावश्‍यक वस्तू कचराकुंडीत टाकाव्या लागतील. थुंकण्यास प्रतिबंध राहील. थुंकल्याचे निदर्शनास आल्यास एक हजार रुपयांचा दंड केला जाईल.

loading image
go to top