धुळे : टुडे पान ३ साठी..
--
मुख्य निवडणूक आयुक्तांना बडतर्फ करा
--
इंडिया आघाडीची धुळ्यात पत्रकार परिषदेत मागणी
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. ७ : एसआयआर प्रक्रियेद्वारे मोठ्या प्रमाणात मतदारांची नावे वगळून मतचोरी केली जात असल्याचा आरोप इंडिया आघाडीतील घटक पक्षांनी केला. याप्रकरणी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना सेवेतून बडतर्फ करून तत्काळ अटक करण्यात यावी, अशी मागणी येथील पत्रकार परिषदेत करण्यात आली. नंतर महाविकास आघाडीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
पत्रकार परिषदेत बोलताना आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी निवडणूक आयोगाच्या अपारदर्शक कारभारावर आक्षेप नोंदवला. गेल्या १० महिन्यांत निवडणूक आयुक्त सुखबीरसिंग संधू व विवेक जोशी यांनी मुख्य निवडणूक आयुक्तांच्या निर्णयांवर किमान १४ वेळा अधिकृत आक्षेप नोंदवले आहेत. यामध्ये एसआयआर प्रक्रिया, मतदार नोंदणी, नावे वगळणे आणि निवडणूक आयोगाच्या आयटी प्रणालीच्या केंद्रीकरणासंदर्भातील निर्णयांचा समावेश आहे. पश्चिम बंगालमध्ये ९२ लाख आणि बिहारमध्ये मोठ्या संख्येने मतदारांची नावे वगळण्यात आली असून, महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ मध्ये ४७ लाख बोगस मतदार वाढल्याचा आरोपही करण्यात आला. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी यासंदर्भात पुराव्यांसह प्रश्न उपस्थित केल्याचे त्यांनी सांगितले. लोकशाही आणि संविधानाच्या रक्षणासाठी ज्ञानेश कुमार यांना पदावरून हटवून अटक करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. पत्रकार परिषदेला कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष युवराज करनकाळ, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे महानगराध्यक्ष धीरज पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष नंदकिशोर येलमामे, मनसे अध्यक्ष बंटी सोनवणे, नरेंद्र परदेशी, साबीर शेख, वाल्मिक मराठे, एल. आर. राव, पोपटराव चौधरी उपस्थित होते.