गस्तीवर शिटी वाजविल्याने
सुरक्षारक्षकावर चाकूने वार
चार जणांचा हल्ला; जखमीला गटारीत फेकले
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. ९ : परिसरात गस्त घालताना शिटी वाजविल्याच्या कारणावरून सुरक्षारक्षक (वॉचमन) फुलसिंग पवार यांच्यावर चार जणांनी वाद घालत चाकूने वार केला. त्यानंतर त्यांना गटारीत फेकून दिले. ही घटना शुक्रवारी (ता. ९) पहाटे प्रभूदेसाई कॉलनीत घडली. जखमी पवार यांच्यावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
प्रभूदेसाई कॉलनी परिसरात फुलसिंग पवार हे पहाटेच्या वेळी गस्त घालत होते. त्या वेळी ते शिटी वाजवत असताना दोन दुचाकींवरून आलेल्या चार जणांनी त्यांना अडवून, ‘आम्हाला पाहून शिटी का वाजवितो?’ अशी विचारणा केली. यावरून त्यांच्यात वाद झाला. त्यानंतर त्यातील एकाने पवार यांच्या मांडीवर चाकूने वार केला. हल्ल्यानंतर त्यांना गटारीत फेकून देत संशयितांनी घटनास्थळावरून पळ काढला. घटनेची माहिती मिळताच रात्रीच्या गस्तीवर असलेले जिल्हापेठ पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक अनिल वाघ, पोलिस कर्मचारी कमलाकर बडगुजर, प्रवीण जाधव आणि चंद्रकांत पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी जखमी पवार यांना तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. तेथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.