फोटो : 31214
नाशिक : जलसेवा संकल्प अभियानाच्या उद्घाटनप्रसंगी मुख्य अभियंता हरिभाऊ गिते, सुबोध मोरे, वैभव भागवत, सोनल शहाणे आदी
...
शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचा; पाण्याचे प्रश्न जागेवर सोडवा
‘जलसेवा संकल्प अभियाना’त मुख्य अभियंता हरिभाऊ गिते यांच्या अधिकाऱ्यांना सूचना
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. २ : अल-निनोच्या प्रभावामुळे निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पाण्याचे काटेकोर नियोजन व संवर्धन करण्यासाठी अधिकाऱ्यांनी मुख्यालयी थांबून न राहता थेट शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचावे, अशा सूचना जलसंधारण विभागाचे मुख्य अभियंता हरिभाऊ गिते यांनी दिल्या.
जलसंपदा विभागातर्फे २ ते १७ ऑक्टोबरदरम्यान आयोजित ‘जलसेवा संकल्प अभियाना’चे उद्घाटन शुक्रवारी सिंचन भवन परिसरात झाले. यावेळी गिते म्हणाले, शेतकऱ्यांसाठी आपण पानदेव आहोत, या भावनेतून काम केले तरच बळीराजाला खरा न्याय देता येईल. अधिकाऱ्यांनी कार्यालयात बसण्याऐवजी शेतकऱ्यांशी थेट संवाद साधावा. त्यामुळे पाणीवाटपासह अनेक प्रश्न जागेवरच सोडविण्यास मदत होईल.
यावेळी गोदावरी, दारणा, कादवा, कश्यपी, नेत्रावती व गौतमी नद्यांच्या कलशातील पाण्याचे पूजन करण्यात आले. पालखेड विभागाचे कार्यकारी अभियंता वैभव भागवत यांनी प्रास्ताविक केले. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अधीक्षक अभियंता सुबोध मोरे यांनी पिण्याचे पाणी, शेतीचे पाणी व जलसंधारण या तिन्ही यंत्रणांमध्ये समन्वयाची गरज व्यक्त केली.
कार्यकारी अभियंता मनोज ढोकचौळे व सोनल शहाणे यांनी अभियानाचे महत्त्व सांगितले. अधीक्षक अभियंता राजेश गोवर्धने यांनी पाणीपट्टी आकारणी व वसुली, अनधिकृत पाणी उपशाला आळा आणि जलसंवर्धनासाठी सर्वांनी योगदान देण्याचे निर्देश दिले.
विकास अहिरे यांनी सूत्रसंचालन केले. अभिजित रौदळ यांनी आभार मानले. यावेळी उपअभियंता प्रवीण पवार, नीलेश वन्नेरे, शाखाधिकारी वैभव कळमकर, हर्षल बागुल, प्रसाद डांगळे, गौरव गोसावी, पाटील, श्रद्धा खोत, सुजाता दुसाने, शीतल सूर्यवंशी, प्रज्ञा जाधव, गणेश हारदे व अनिल सूर्यवंशी उपस्थित होते.