
नाशिक : ब्रिटिश काळातील बंधारा दुरुस्तीमुळे शेतीपिकांना नवसंजीवनी
अंबासन (जि.नाशिक) : येथील ब्रिटिश कालीन बंधारा पुरपाण्यामुळे फुटल्यानंतर गेली अनेक वर्षांपासून या भागातील शेतीव्यवसायाला घरघर लागली होती तर गावात पाणीटंचाईचे दुर्भिक्ष्य जाणवत होते. काही दिवसांपूर्वीच या बंधा-याचे काम सुरू होताच नागरिकांकडून समाधान व्यक्त केले जात असून गावातील पाण्याचा प्रश्न व शेतीव्यवसायाला पुन्हा गतवैभव प्राप्त होऊन नंदनवन फुलणार असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
शेतकऱ्यांसाठी तो काळा दिवस ठरला...
सह्याद्री पर्वत रांगांमधील साल्हेर, शेंदवड आदी डोंगरदऱ्याने उगमस्थान असलेल्या हरणबारी धरणातून मोसम नदीपात्रातून थेट गिरणा नदीत संगम पावते. सन १९४४ मध्ये मोसम खो-यातील शेतकऱ्यांसाठी तो काळा दिवस ठरला होता. पुरपाण्यामुळे मोसम नदीपात्रात असलेले ब्रिटिश कालीन बंधारे तग धरू शकले नाहीत आणि फुटले बहुतांश गावात पुरपाणी शिरले होते. अनेक शेतक-यांची शेतीचे साहित्य, जनावरे वाहुन गेली होती. मोसम पट्टय़ातील ऊसाचे गु-हाळे, उभ्या असलेली पिकांची नासाडी झाली होती. त्यामुळे या भागात शेतीपिकांना पाण्याची चणचण भासू लागल्याने उस आणि गु-हाळे नामशेष होत गेली आणि नगदी पिके शेतकरी घेऊ लागले.
पिण्याचा प्रश्न सुटण्यास मदत होणार...
कालांतराने शेतीव्यवसाय रुळावर येत असतांनाच ९ सप्टेंबर १९६९ मध्ये पुन्हा मोसम नदीपात्रातून महापुरात शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले होते असे जाणकार सांगतात. तेव्हापासून मोसम नदीकाठावरील गावांना तीव्र पाणीटंचाईचे दुर्भिक्ष्य जाणवत होते. सामाजिक, राजकीय तसेच गावातील नागरिकांकडून ब्रिटिश कालीन बंधारा दुरूस्त केल्यास पुन्हा पूर्वीसारखे शेतीसह गावांना नवसंजीवनी, गतवैभव प्राप्त होण्यास मदत होईल या आशेवर पाठपुरावा सुरू केला आणि यशस्वी झाले. अंबासन येथील ब्रिटिश कालीन बंधारा दुरूस्तीसाठी ७३ लाख ७५ हजारांचा भरीव निधी मंजूर होऊन कामाला सुरूवात झाली असून बंधा-याच्या दुरुस्तीमुळे मोराणे सांडस, काकडगाव, अंबासन तसेच बिजोरसे शिवारातील शेतीसह गावांच्या पिण्याचा प्रश्न काही अंश सुटण्यास मदत होणार आहे.
ठेकेदाराकडून दिरंगाई
अंबासन (Ambasan) येथील ब्रिटिश कालीन बंधा-याची दुरूस्ती संबंधित ठेकेदाराकडून अगदी संथ गतीने सुरू असून गेल्या अनेक दिवसांपासून काम बंद स्थितीत आहे. पावसाळा जेमतेम दीड महिन्यात येऊ ठेपला असताना ठेकेदाराकडून दिरंगाई केली जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून केला जात आहे. बंधा-यातील दुरूस्ती कामाला गती देऊन काम मार्गी लावावे अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
नदीकाठावर वसलेली गावे
अंतापूर, ताहाराबाद, सोमपूर, जायखेडा, ब्राम्हणपाडे, आसखेडा, द्याने, नामपूर, अंबासन, वडनेर, खाकुर्डी, अजंग, वडेल, वडगाव, मालेगाव.
"मोसम नदीपात्रातील बंधा-याची दुरूस्ती होताच शेतीशिवारात तसेच गावातील पाण्याची मुबलक सोय उपलब्ध होणार आहे. परिसरात शेतीव्यवसायला गतवैभव प्राप्त होऊन पुन्हा नंदनवन फुलविण्यात मदत होईल."
-राजसबाई गरूड, सरपंच अंबासन