esakal | Nashik : जलसंपदाची कार्यालये नाशिकबाहेर जाणार नाहीत
sakal

बोलून बातमी शोधा

nashik

जलसंपदाची कार्यालये नाशिकबाहेर जाणार नाहीत

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नाशिक : गुजरातकडे जाणारे पाणी मराठवाड्याकडे वळविण्याचे बहुतांश प्रकल्पांचे कामकाज नाशिकमधून चालणार असल्याने जलसंपदा विभागाचे कुठलेच कार्यालय नाशिकच्या बाहेर हलविण्याचा शासनाचा विचार नाही, अशी माहिती जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी दिली. तत्पूर्वी जिल्ह्यातील आमदारांनी कामांचे नियोजन करताना भूमिपुत्रांचा विचार करून त्यांना पाणी उपलब्धतेच्या दृष्टीने आराखडा तयार करावा व जमिनी देणाऱ्या भूमिपुत्रांसह त्यांच्या पाण्याचा विचार कारावा, असे साकडे घातले.

श्री. पाटील यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात जलसंपदा योजनांची आढावा बैठक झाली. त्या वेळी ते बोलत होते. पालकमंत्री छगन भुजबळ, विधानसभेचे उपसभापती नरहरी झिरवाळ, आमदार ॲड. माणिकराव कोकाटे, दिलीप बनकर, हिरामण खोसकर, सरोज आहिरे, गोदावरी मराठवाडा विकास महामंडळ (औरंगाबाद)चे कार्यकारी संचालक कि. भा. कुलकर्णी, उत्तर महाराष्ट्र प्रदेश नाशिकचे मुख्य अभियंता डॉ. संजय बेलसरे, मुख्य अभियंता प्रमोद मांदाडे, महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्थेचे महासंचालक आर. आर. शहा, अधीक्षक अभियंता अलका अहिरराव, अरुण नाईक, महेंद्र आमले यांच्यासह जलसंपदा विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

श्री. पाटील म्हणाले, की मांजरपाडाचे कामकाज पूर्ण झाल्याने यंदा पाच ते सहा दशलक्ष घनफूट पाणी वळविणे शक्य झाले आहे. गुजरात राज्याकडे समुद्रात वाहून जाणारे पाणी गोदावरी खोऱ्यातून मराठवाड्याला वळविण्याच्या अनेक योजनांवर शासनस्तरावर काम सुरू आहे. गोदावरी, पालखेड डावा कालवा, बोरी, आंबेदरी आदींसाठी सुमारे १४० कोटींची कामे होणार आहेत. देवस्थाने- मांजरपाडा घळभरणी आदींसह कोट्यवधींची कामे प्रस्तावित आहेत. डिसेंबरपर्यंत दमणगंगा एकदरेचा डीपीआर पूर्णत्वास येणार आहे.

गुजरातला जाणारे महाराष्ट्राच्या वाट्याचे पाणी गोदावरी खोऱ्यात वळविण्यास राज्य शासनाचे आगामी काळात प्राधान्य राहणार असून, दमणगंगा, एकदरे, गोदावरी प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) डिसेंबरपर्यंत पूर्ण होईल. याशिवाय इतरही अनेक कामे गतीने सुरू होतील. ही सगळी कामे नाशिक जिल्ह्यातच होणार आहेत. त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणावर कामे प्रस्तावित असताना जलसंपदा विभागाची कुठलीही कार्यालये नाशिक जिल्ह्याच्या बाहेर नेऊन चालणार नाही.

स्थानिकांचा पाण्याचा वाटा ठेवा

जिल्ह्यातील आमदारांनी कामांचे नियोजन करताना तेथील भूमिपुत्रांचा विचार करून त्यांना पाणी उपलब्धतेच्या दृष्टीने आराखडा तयार करावा व त्यात स्थानिकांचा पाण्याचा वाटा ठेवावा, अशी मागणी केली. पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले, की गुजरात व समुद्राकडे जाणारे पाणी आपल्या राज्यात वळविण्याच्या अनुषंगाने नार-पार हा अतिशय महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्याची तहान भागून मराठवाड्याला देखील पाणी वळविणे शक्य होणार असल्याने हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करण्यात यावेत. त्याचप्रमाणे दमणगंगा-वैतरणा-गोदावरी, दमणगंगा-एकदरे-गोदावरी, गारगाई-वैतरणा-कडवा-देवनदी लिंक या नदीजोड प्रकल्पांचा डीपीआर (सविस्तर प्रकल्प अहवाल) तयार करण्यात यावा.

loading image
go to top